पणजी: गोव्यातील गुन्हेगारी आणि गैरकृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. सायबर क्राईम विभागाने वास्को येथे सुरू असलेल्या एका मोठ्या ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला, तर दुसरीकडे पर्यटनस्थळांवर दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठीही कठोर कारवाई सुरू आहे. या दोन्ही कारवायांनी गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी सायबर क्राईम पोलिसांनी वास्कोतील एका आलिशान वसाहतीत छापा टाकून ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट उध्वस्त केले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री उशिरा ही कारवाई केली. यावेळी तीन व्यक्तींना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपींमध्ये रवींद्र कुमार शर्मा, सुनील कुमार आणि बिरेंद्र कुमार मंडल यांचा समावेश आहे. हे तिघेही बिहारमधील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ११ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, आणि सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे विशेष उपकरण (ऑडिओ मिक्सर) जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वेगवेगळ्या लोकांच्या नावाने नोंदणीकृत सिमकार्ड वापरून सट्टेबाजी करत होते. त्यांच्यावर गोवा सार्वजनिक जुगार कायदा तसेच आयटी कायद्यांतर्गत 'ओळख चोरी'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्कोतील सायबर गुन्हेगारीवर कारवाई सुरू असतानाच, राज्याच्या पर्यटनस्थळांना बदनाम करणाऱ्या दलालांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ३० दिवसांत ४५ हून अधिक दलालांना अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यात जुनैद, वरुण प्रजापती, पृथ्वी पाटोळे, प्रमोद, सूरज वर्मा, आणि मन्नान या सहा जणांचा समावेश आहे.
या सर्व आरोपींना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पर्यटनस्थळांवरील दलालांमुळे गोव्याची प्रतिमा खराब होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली असून, भविष्यातही दलालांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.