पणजी: उत्तर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन विदेशी महिला पर्यटकांना त्रास देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथून तीन संशयितांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात काही देशी पर्यटक दोन विदेशी महिला पर्यटकांना जबरदस्तीने फोटो काढण्यास सांगत होते. आरोपींनी महिलांच्या हाताला धरून फोटोसाठी पोज देण्याचा आग्रह केला. महिला अस्वस्थ दिसत असतानाही, आरोपींनी त्यांचे खांदे आणि कमरेभोवती हात टाकून फोटो काढण्याचा दबाव आणला. या घटनेमुळे गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
प्रकरणाचे गांभीर्य आणि गोव्याच्या पर्यटन सुरक्षिततेच्या प्रतिमेवर होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, पर्यटन पोलिस निरीक्षकांनी राज्याच्या वतीने स्वतःहून तक्रार दाखल केली. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मांद्रे पोलिस स्थानक येथे गुन्हा नोंदवण्यात आला. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी माहिती दिली की, गोवा पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून ही आंतरराज्य कारवाई यशस्वी केली. अटक केलेल्या आरोपींची नावे कार्तिक बी.आर. (२८), बी.एन. संतोष (३३) आणि रवी बी.एन असून त्यांना म्हैसूर आणि बंगळूरू येथून अटक करण्यात आली.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले की, कारवाईची माहिती आधीच उघड केल्यास गुन्हेगार सतर्क झाले असते. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ही माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक होती.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, मांद्रे पोलिस पथकाने (PSI परेश काळे, PSI अभिषेक चोडणकर, कॉन्स्टेबल योगेश शिंदे, रोहन शिवोलकर आणि गणराज शेटकर यांचा समावेश) संशयितांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.