Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसचे ‘लाव रे तो व्हिडिओ’

Khari Kujbuj Political Satire: ‘एक पेड मॉं के नाम’...सध्या चर्चेत आहे. काहीही झाले तरी आईच्या नावाने चांगभलं, हा प्रकार असतोच, पण पिता कुठे आहे...!

Sameer Panditrao

काँग्रेसचे ‘लाव रे तो व्हिडिओ’

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्रात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या भाषणात ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा पॅटर्न भाव खाऊन जात होता. ठाकरेंच्या ज्याठिकाणी सभा होईल, त्याठिकाणी खास व्हिडिओ दाखविण्यासाठी स्क्रिन उभारला जात होता. ‘लाव रे तो व्हिडिओ’ ची आठवण याच्याचसाठी की सध्या काँग्रेस भवनात पत्रकार परिषद म्हटली की व्हिडिओ क्लिप दाखविणे आलेच. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अगोदर ‘व्हिडिओ क्लिप’ पाहुया असे सांगतात. त्यामुळे त्यांच्या व्हिडिओ क्लिप दाखविण्याची सूचना आली, की राज ठाकरेंच्या त्या घोषणेची आठवण होते. व्हिडिओ क्लिपद्वारे पुरावे दाखविणे, वस्तुस्थिती सांगणे आणि जे काही सांगायचे आहे, ते नेमकेपणाने माध्यमांपर्यंत पोहोचले जाते. काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांत ‘लाव रे तो व्हिडिओ’ वर नित्याचा भर राहणार असेच दिसते.∙∙∙

झाडांची निगा राखणार ना?

‘एक पेड मॉं के नाम’...सध्या चर्चेत आहे. काहीही झाले तरी आईच्या नावाने चांगभलं, हा प्रकार असतोच, पण पिता कुठे आहे...! वास्तविक आई तशी मोठी आहेच, पण वडिलांनाही तेवढेच महत्त्व आहे. वडील आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी ढोर मेहनत करतो, पण त्याची मेहनत मात्र नजरआड केली जाते. आज आईचा ट्रेंड आला आहे, उद्या कदाचित वडिलांचाही येईल. मात्र कुणाच्या तरी नावाने सध्या वाटण्यात येणारी रोपे व्यवस्थित लावली जात आहेत ना, त्यांची निगा योग्यप्रकारे घेतली जाईल ना...अशी चर्चा मात्र होताना दिसते. ∙∙∙

गोष्ट म्हापसा शहराची...

गेल्या मे महिन्यात जो अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे खोर्ली म्हापसा परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. या पावसाच्या पाण्यात एका दुचाकी चालकाचा तोल गेलो होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. राष्ट्रीय माध्यमांनी या व्हिडिओची दखल घेतली होती. त्यानंतर पालिकेवर सर्वच बाजूने टीकेची झोड उठली. अशातच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पालिकेत हजेरी लावून प्रशासकीय व पालिका मंडळाचा ‘क्लास’ घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका कामकाजावर नाराजी व्यक्त केली. पालिका मंडळ व स्थानिक आमदार कमी पडल्यानेच, खुद्द मुख्यमंत्र्यांना स्वतः यावे लागले. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना घेरले. मुखमंत्र्यांनी म्हापसा दत्तक घेऊन पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यास कुणाला नवल वाटणार नाही! नेते शहरातील कामांपेक्षा दुबई वाऱ्या अन् नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मश्गूल असतात, असे म्हापसेकर बोलू लागलेत. ∙∙∙ ∙∙∙

स्तुतिमागचं नेमकं इंगीत काय?

आपले छोटे खाशे म्हणजे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे बरेच सौम्य होताना दिसत आहेत, असे आम्ही नव्हे तर त्यांना जवळून ओळखणारे लोकच म्हणत आहेत. एरवी त्यांच्याजवळ असलेल्या खात्यांतील कर्मचारी खासगीत त्यांना ‘ॲंग्री यंग मॅन’ म्हणतात. पण त्याचबरोबर हेही खरे की, त्यांना कामचुकारपणा सहन होत नाही व म्हणून ते चुकारांना फटकारतात. पण आता मुद्दा आला आहे तो, मंत्रिमंडळांतील ज्येष्ठांची ते जी प्रशंसा करू लागले आहेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. मागे त्यांनी मडगावच्या बाबांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती व परवा पर्यावरणदिनी फोंड्याच्या पात्रांवाची अशीच प्रशंसा केली. त्यामुळे हा काय प्रकार आहे, असे कोडे अनेकांना पडले आहे. गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना लांबणीवर पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नव्या समीकरणाची नांदी तर नसावी ना, अशी शंका अनेकजण घेऊ लागलेत खरे. ∙∙∙

मंत्रिमंडळ बदलाचा फटका कुणाला?

फोंड्यातील मंत्री सध्या धास्तावले आहेत. फोंड्यातील चारही मतदारसंघात चार मंत्री आहेत. सध्या मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहू लागल्यामुळे आता कुणाचा नंबर हा प्रश्‍न या चारही मंत्र्यांना पडला आहे. वास्तविक एका तालुक्यातील चारही मतदारसंघांना मंत्रिपद मिळण्याचे भाग्य फोंडा तालुक्याला लाभले आहे. मात्र, आता मंत्रिमंडळ बदलाचा फटका कुणाला, हा प्रश्‍न या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.∙∙∙

नेमकी काय चर्चा झाली?

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. असे असले तरी संधी मिळताच मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक दर्शवण्याची संधी गावडे सोडत नाहीत. शुक्रवारी दोनापावल येथे सरकारी कार्यक्रमातही दोघे एकत्र आले. त्यावेळी गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगणे सुरू केले. त्यावेळी असलेले दोघांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच बोलके होते. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितले असेल याची चर्चा नंतर उपस्थितांतच नव्हे, तर विस्फारलेल्या डोळ्यांनी छायाचित्र पाहिलेल्यांत सुरू होती. ∙∙∙

रवींद्र भवनमधील तू तू मैं मैं!

सध्‍या का कुणास ठाऊक ईएसजीच्‍या कार्यकारी समितीमधील माजी सदस्‍य विशाल काकोडे यांनी मडगावच्‍या रवींद्र भवनचे अध्‍यक्ष राजेंद्र तालक यांच्‍या विरोधात जणू मोहीमच उघडली आहे. यापूर्वी विशाल काकाेडे यांनी रवींद्र भवनच्‍या छपराच्‍या दुरुस्‍तीविरुद्ध राजेंद्र तालक यांच्‍यावर दुगाण्‍या डागल्‍या होत्‍या. काल त्‍यांनी पुन्‍हा एक पत्रक काढून तालक यांची कामकाजाची पद्धत ही हुकूमशाही असल्‍याचा आरोप केला आहे. कारण राजेंद्र तालक अध्‍यक्ष झाल्‍यानंतर रवींद्र भवनचे बुकींग करणे कटकटीचे झाले आहे, असा काकोडे यांचा दावा आहे. काकोडे यांच्‍या या आरोपात तथ्‍य किती आहे, हे या रवींद्र भवनात कार्यक्रम करणारे कलाकार आणि संघटकच सांगू शकतील. ‘गोमन्तक टीव्ही’च्या कार्यक्रमात तालक यांनी काकोडे यांच्यावर हल्ला चढवला होता, त्याची संपूर्ण भरपाई काकोडे आता करू लागलेत, असे वाटू लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT