

T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 चे बिगुल वाजले असून यंदा या भव्य स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे भूषवत आहेत. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी केलेला मेसेज सध्या तुफान व्हायरल होत असून, यामुळे अमेरिकेतील क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आपल्या खास शैलीत लिहिले की, "मला आताच समजले की भारतात क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे! मी टीम USA ला खूप खूप शुभेच्छा देतो. आपला संघ खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण अमेरिकेचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे!" ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिकन खेळाडूंचा उत्साह तर वाढलाच, पण जागतिक क्रिकेटमध्येही याची विशेष दखल घेतली गेली. 7 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले असून, 8 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अमेरिकेचा संघ अ गटात (Group A) असून त्यांची लढत भारत (India), पाकिस्तान, नामीबिया आणि नेदरलँड्स यांसारख्या तगड्या संघांशी होणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच अमेरिकेने (America) आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले. 7 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेचा सामना बलाढ्य भारतीय संघाशी झाला. हा सामना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने थरारक ठरला. अमेरिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. नाणेफेक जिंकून अमेरिकेने पहिल्यांदा टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र पॉवरप्लेमध्येच टीम इंडियाची अवस्था 46 धावांवर 4 गडी बाद अशी झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला, तर शॅडली वॅन शाल्कविकने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात एकामागून एक तीन धक्के देत भारताला बॅकफूटवर ढकलले.
अशा कठीण प्रसंगी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने खऱ्या अर्थाने जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने 49 चेंडूत 84 धावांची नाबाद आणि झुंजार खेळी साकारली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार ठोकले. सूर्याच्या या कर्णधार खेळीमुळे भारताला 20 षटकांत161 धावांपर्यंत मजल मारता आली. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला भारतीय गोलंदाजीच्या धारदार माऱ्याचा सामना करावा लागला.
भारतीय गोलंदाजांनी अमेरिकेला 132 धावांवर रोखले. विशेषतः मोहम्मद सिराजने 29 धावांत 3 बळी घेत अमेरिकेचा कणा मोडला आणि भारताने 29 धावांनी हा सामना जिंकून विजयी सलामी दिली. पराभव झाला असला तरी, अमेरिकन संघाने ज्या जिद्दीने भारताला टक्कर दिली, त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.