मडगाव: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास सोमवारपासून सुरवात झालेली असून आज तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्यास जोर वाढला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका असलेल्या सासष्टीत निवडणूकीच्या वाऱ्याने वेग धरला आहे. (Goa Panchayat Election: 144 nominations submitted in first three days at Salcete )
या तालुक्यात एकूण 33 पंचायती असून आज तिसऱ्या दिवशी एकूण 64 उमेदवारी अर्ज भरले गेले त्यात गिर्दोळीचे माजी सरपंच मिलाग्रीस रोड्रीग्स, कुडतरीचे माजी सरपंच सायमन बार्रेटो, कामुर्लीचे सरपंच बासिलो डायस आदींचा समावेश होता. आतापर्यंत पहिल्या तीन दिवसात 144 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात नेले आहेत व अजूनही नेले जात असल्याचे मामलेदार कार्यालय सुत्रांनी सांगितले.
त्याच प्रमाणे या अर्जांसोबत लागणारे थकबाकी नसल्याचा, निवासी व अन्य दाखले घेण्यासाठी पंचायत कार्यालयात हे इच्छुक लगबग करताना आढळतात. अनेक ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन प्रचार सुरु केला आहे. 25 जुलै हा उमेदवारी दाखल करण्याचा अंतीम दिवस असल्याने शेवटच्या दिवसात उमेदवारांची झुंबड उडेल अशी चिन्हे दिसतात.
सासष्टीतील पंचायती तीन निर्वाचन अधिका-यांकडे सोपविलेल्या आहेत. लक्ष्मीकांत देसाई, प्रवीण गावस व धिरेन बाणावलीकर अशी त्यांची नावे असून ते एकंदर व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. तालुक्यात निवडणुक ज्वर वाढू लागला आहे व राजकीय पक्षही उमेदवार निश्चित करण्याच्या तयारीस लागलेले असले तरी मतदार मात्र गत पंचायत मंडळे व पंचमंडळी बाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात. अनेकांनी तर पंचायतीतून जुन्या लोकांनी निवृत्ती घ्यावी व नव्या चेह-यांना संधी द्यावी असे प्रतिपादन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.