Anurag Singh Thakur: भारत हा जगातील सर्वांत मोठ्या चित्रपट निर्मात्या देशांपैकी एक आहे. त्यामुळेच इफ्फीतील ‘फिल्म बझार’मध्ये जगभरातील अनेक चित्रपट निर्माते सहभागी होऊन भारतीय चित्रपट निर्मात्यांशी सहकार्य करार करतात.
तब्बल 800 चित्रपटांची देवाणघेवाण होत आहे. साहजिकच भारत ही चित्रपट उद्योगाची एक मोठी बाजारपेठ बनली आहे, असे मत केंद्रीय माहिती, प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी व्यक्त केले.
दक्षिण आशियातील सर्वांत मोठी चित्रपट बाजारपेठ ‘फिल्म बझार’चे ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, सचिव अपूर्व चंद्र आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसेच चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, इफ्फीत चित्रपटांसाठी सहनिर्माते आणि सहकारी शोधण्याच्या विपुल संधी आहेत. चित्रपट निर्मिती आणि विक्रीची मोठी बाजारपेठ बनण्याचे आमचे ध्येय आहे. यंदाच्या इफ्फीमध्ये बदल घडविण्यासाठी नवीन उप्रकम सुरू करण्यात आलेले आहेत.
‘फिल्म बझार’चे बदलते स्वरूप ठरतेय लक्षवेधी
2007 मध्ये लहान प्रमाणात सुरू झालेला ‘फिल्म बझार’ हा दक्षिण आशियातील जागतिक चित्रपट बाजारपेठ म्हणून विकसित झाला आहे. दरवर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचा सहभाग वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत लंच बॉक्स, मार्गारिटा विथ अस्ट्रो, चौनौती कूट, किस्सा, शिप ऑफ थिसस, तितली, कोर्ट, अन्हे घोडे दा दान, मिस लव्हली, दम लगाके हैशा, लायर्स डाइस आणि थिथी या चित्रपटांवर कार्यक्रम झालेले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ‘फिल्म बझार’ जगभरातील चित्रपट ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी आकर्षण ठरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.