मडगाव: राज्यातील पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 'गोंयत कोळसो नाका' (Goyant Kollso Naka) या आंदोलनाला रविवारी (9 नोव्हेंबर) विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोहिया मैदान, मडगाव येथे एकत्र येऊन सक्रिय पाठिंबा दर्शवला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, ऍड. कार्लोस फरेरा, विरेश बोरकर, वेंझी व्हिएगस आणि आरजीपी (RGP) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी आंदोलनातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर तीव्र टीका केली. आलेमाव म्हणाले, "मला वाईट वाटते की पाच वर्षांपूर्वी 'गोंयत कोळसो नाका' चळवळीत जे नेते आमच्यासोबत होते, ते आता भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत आणि कोळशाच्या मुद्द्यावर पूर्णपणे गप्प आहेत. मुरगाव पोर्ट अथॉरिटी (MPA) हे राज्याच्या आतमध्ये एक वेगळे 'राज्य' बनले आहे. विशेषत: कोळशाच्या बाबतीत येथे खूप 'दादागिरी' सुरु आहे. आम्ही नेहमीच 'गोंयत कोळसो नाका' चळवळीला पाठिंबा देऊ."
तसेच, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी या लढ्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "जर गोव्याच्या जनतेला खरोखरच राज्यात कोळसा नको असेल, तर भाजप सरकारला पराभूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. आम्ही केवळ कोळशाविरोधात नाही, तर सध्याच्या सरकारला पराभूत करण्यासाठीही एकत्र आलो आहोत."
आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांनी कोळसाबंदीसाठी राजकीय बदलाची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले "राज्यात कोळसा थांबवायचा असेल, तर भाजप सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे. 'गोंयत कोळसो नाका' चळवळीची जाणीव प्रत्येक गावापर्यंत पोहोचायला हवी. मला विश्वास आहे की, पुढील वर्षी सरकार बदलले आणि गोव्यातून कोळसाही कायमचा जाईल." या एकजुटीमुळे विरोधी पक्षांनी कोळसा वाहतुकीला विरोध करण्यासोबतच, आगामी काळात भाजप सरकारविरोधात संयुक्तपणे काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.