37th National Games: गोवा सरकारने 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानाचे मोठे तंबू वापरले. स्पर्धा संपली आणि हे तंबू हटविण्याचे काम सुरू झाले. त्याचवेळी या तंबूत वापरलेल्या महागड्या अत्याधुनिक क्रीडा साहित्याचे संवर्धन करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तंबूत वापरलेल्या विविध खेळांच्या साहित्याची योग्य निगराणी केली नाही, तर ते खराब होण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी क्रीडा स्पर्धेसाठी वापरलेले साहित्य व साधनांचा योग्य वापर करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
त्याचवेळी त्यांनी संबंधितांना थेट इशाराही दिला आहे. गोवा क्रीडा प्राधिकरण व क्रीडा खात्यावर क्रीडा साहित्याच्या संवर्धनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रीडा खाते, प्राधिकरणाला स्पष्ट इशारा
``क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक तसेच प्रशिक्षक व अन्य कर्मचारी या क्रीडा साधनसामुग्री सांभाळण्यास जबाबदार असतील. साहित्याची नोंद ठेवावी लागणार आहे.
ही साधने पुन्हा कशी वापरता येतील, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, प्रत्येक अधिकाऱ्याशी बोलणे शक्य नसते. साहित्याची हानी झाल्यास प्रशिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह प्रत्येक संबंधिताला मी जबाबदार धरीन,`` असे गावडे यांनी स्पष्टच सांगितले.
स्वच्छतेसाठी आठवडाभर लागणार
क्रीडामंत्री गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर फोंडा क्रीडा संकुलाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. ``कांपाल येथील क्रीडानगरीलाही मी भेट दिली आहे. तेथील कंत्राटदाराला योग्य त्या सूचना केल्या आहेत.
मैदानावरील मोकळे करण्यास सात-आठ दिवस लागतील. सामुग्री उतरविल्यानंतर ती तेथून हलविण्यात येईल. तसेच प्लॅस्टिक बाटल्या आणि इतर कचराही काढण्यात येईल,`` असे ते म्हणाले.
आता जबाबदारी वाढली
क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ``राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे संपली आहे, पण आता क्रीडा साहित्य व उपकरणे योग्य ठिकाणी ठेवण्याबाबत जबाबदारी वाढली आहे. जर्मन हँगर्स तंबू योग्यपणे उतरविल्यानंतर साहित्य साफ करताना स्वच्छता अत्यावश्यक आहे. सर्व गोष्टी योग्य ठिकाणी ठेवणे ही माझी जबाबदारी समजतो, त्यालाच प्राधान्यक्रम असेल.``
``मी क्रीडा हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. यातील गुंतवणुकीत गोव्यातील करदात्यांचे पैसे गुंतले आहेत. त्यामुळे जशी आपण घरातील वस्तूंची काळजी घेतो तशीच खबरदारी स्पर्धेसाठी वापरलेल्या क्रीडा साहित्याची घ्यावी लागणार आहे.``
-गोविंद गावडे, क्रीडामंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.