पणजी: राज्यात सक्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरांवर बंदी घालणारा कायदा करावा लागणार आहे. त्यावेळी विरोधकांनीही सरकारला साथ द्यावी. लव्ह जिहादची प्रकरणे राज्यात घडत आहेत. त्याची आकडेवारी मात्र, नंतर देतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विधानसभेत म्हणाले.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडलेल्या आयेशाविषयी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी हे निवेदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, आयेशाचे पालक गोव्यात राहत असले तरी ती केवळ सुट्टीत गोव्यात यायची. तिचे शिक्षणही गोव्याबाहेर झाले आहे.
इतरही बरेच तपशील पोलिसांच्या हाती आलेत. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. तिचा शोध गोवा पोलिसांनीच घेतला. गोव्यातही एकजण बाबागिरी करून धर्मांतर करत होता. त्याची बाबागिरी सरकारने बंद केली आहे. हे सारे पाहता सक्तीचे धर्मांतर रोखणारा कायदा हवा.
यावर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी अल्पसंख्याक म्हणजे कोण, अशी विचारणा केली. आपल्या धर्माकडून सक्तीचे धर्मांतर होत नाही, असे ते म्हणाले. सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनीही धर्मांतर रोखण्याच्या नावाखाली सरसकट काही केले जाऊ नये, अशी मागणी केली. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकार राष्ट्रीय विषय येथे या घटनेचा फायदा घेत रेटू पाहत आहेत, लव्ह जिहाद वैगेरे गोव्यात होत नाही, असे सांगितले. तत्पूर्वी शेट म्हणाले, दहशतवादी संघटनांशी आयशाचा संबंध होता का, तपास झाला पाहिजे.
वीरेश बोरकर यांनी भाडेकरू पडताळणी पद्धती सदोष असल्याकडे लक्ष वेधत खास विभागाची मागणी केली. पोलिस आधारकार्ड घेतात. त्या त्या राज्याच्या पोलिसांकडे पाठवतात पण तेथून काहीच कळवले जात नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यातून कशी समजणार अशी विचारणा त्यांनी केली.
सिल्वा म्हणाले, जुने गोवे येथे अलीकडेच शव दर्शन सोहळा झाला. आयेशा तिथेच राहत होती. तिने पहलगामसारखे कृत्य तेथे घडवून आणले असते तर कोण जबाबदारी घेणार होता. निदान आता त्यादृष्टीने तपास व्हावा. सरदेसाई यांनी आयेशाच्या कारवाया सुरू असताना पोलिस काय भजी तळत होते काय अशी संतप्त विचारणा केली. कार्लुस फेरेरा यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मदत करून गोवा पोलिसांची जबाबदारी संपत नाही, असे नमूद केले. वेन्झी व्हिएगस यांनी आयेशाला कोणाच्या दबावावरून आजवर पकडले नाही, अशी विचारणा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.