Goa Murder Case11th Day
Goa Murder Case11th Day Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case11th Day: पंचनाम्‍याचा घोळ; आक्रोश, हुंदके, मृत्‍यूचे गूढ कायम!

अनिल पाटील

हळदोणे: नास्‍नोळा येथील 19 वर्षीय तरूणीच्या घरात अद्याप दुःखाचे सावट आहे. तिचे आई-वडील, नातेवाईक यांचे हुंदके, आक्रोश आजही कानात चिरत आहेत. तरूणीच्या बेपत्ता होण्यापासून ते कळंगुट किनाऱ्यावर मिळालेल्या अर्धनग्न मृतदेहापर्यंत अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. तीच्‍या मृत्‍यू प्रकरणाला आज अकरा दिवस झाले आहेत. तरूणीचे कुटुंब या आघातातून अद्यापही सावरू शकले नाही. त्‍यांच्‍या सांत्‍वनाला येणाऱ्यांनाही तरूणीचा मृत्‍यू सहन होत नाही. त्‍यामुळे भेटण्‍यासाठी आल्‍यानंतर आक्रोश, हुंदके थांबतच नाहीत. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता ते मंगळवारी पहाटे सहा या दरम्‍यानच्‍या 21 तासांत तरूणीचा मृतदेह सापडेपर्यंत नेमके काय झाले याचा छडा लावण्‍यास पोलिस असमर्थ ठरले आहेत.

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणी नाईक कुटुंबीयांची पोलिसांनी अक्षरश: परवडच केली. सर्वसामान्‍य आहोत म्‍हणून आमच्‍या पोटच्‍या पोरीने आत्‍महत्‍या केली हे कसे काय म्‍हणू शकता? असा परखड सवाल सिद्धीच्‍या आई-वडिलांनी उपस्‍थित केला. सिद्धीच्‍या कुटुंबाला मृत्‍यूचे ठोस कारण पंचनाम्‍याची प्रत न दिल्‍यामुळे समजू शकले नाही. तसेच घटनास्‍थळाचा पंचनामा झाला की नाही, याबाबतही साशंकता आहे. त्‍यामुळे ऑगस्‍ट महिन्‍यातच ‘लाडली लक्ष्‍मी’चा अर्ज मंजूर झाल्‍याचा संदेश आलेल्‍या सिद्धीवर सरकारने अन्‍यायच केला, अशी प्रतिक्रिया शेजाऱ्यांकडून व्‍यक्त केली जात आहे.

पोलिसांना धागेदोरे कसे सापडले नाहीत?

बस्‍तोडा बसथांब्‍यावर सोमवारी सकाळी ९.३० वा. सिद्धीला त्‍याच्‍या वडिलांनी पर्वरीला जाण्‍यासाठी सोडले होते. त्‍यानंतर तब्‍बल २१ तासांनी तिचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनारी नग्‍नावस्‍थेत कसा काय सापडला. तिच्‍याजवळ अवघे ५० रुपये होते, तर ती कळंगुटला कशी काय पोहोचली. सकाळी ९.३० ते मंगळवारी पहाटे ६ या काळात काय घडले? कळंगुट परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेल, वाहनांचे फुटेज, तसेच त्‍या परिसरात वाहनांच्‍या चाकांचे मार्क दुर्लक्षून चालणार नाही. त्‍यात काहीतरी धागेदोरे पोलिसांनी कसे सापडले नाहीत. सिद्धीचा बुडून मृत्‍यू झाला, तर तिचा मृतदेह पाण्‍याने फुगलेला आढळायला हवा. केवळ फुफ्‍फुसात काही प्रमाणात पाणी कसे आढळले? असे सवाल त्‍यांचे नातेवाईक व ग्रामस्‍थ विचारत आहेत.

पंचनाम्‍याचा घोळ? : वडिलांना ठेवले अंधारात

सिद्धी बेपत्ता झाल्‍यानंतर मंगळवारी पहाटे किनारपट्टीवर मृतावस्‍थेत स्‍थानिकांना आढळून आली. त्‍यानंतर पोलिस ६.३० वा. घटनास्‍थळी पोहोचले व मृतदेह थेट बांबोळीला पाठविण्‍यात आला. मात्र, याबाबतची काहीच कल्‍पना सोमवारी सकाळी ११.१५ वा. तक्रार नोंदविलेल्‍या वडिलांना कशी काय दिली नाही. सकाळी १० वा.च्‍या सुमारास सिद्धीचे वडील पोलिस स्‍थानकात चौकशीसाठी आल्‍यावर त्‍यांच्‍यासोबत असलेल्‍या एका व्‍यक्तीला १०.३० वा. याबाबतची अप्रत्‍यक्ष माहिती दिली. मात्र, मृतदेहाची ओळख पटविण्‍यासाठी बांबोळीला जावे लागेल, असे सांगण्‍यात आले. बिचाऱ्या बापाला काय घडले याची सूतराम कल्‍पना बांबोळीत पोहोचल्‍यावरही आली नाही, पण मोठा धीर करून अज्ञाताचा म्‍हणून पाहिलेला मृतदेह पाहिल्‍यावर पायाखालची वाळूच सरकली आणि त्यांनी हंबरडाच फोडला.

२१ तासांत काय घडले?

सिद्धी सोमवारी सकाळी ९.३० ते मंगळवारी पहाटे ६ वा. मृतावस्‍थेत सापडली. मात्र, त्‍या २१ तासांत काय घडले, याबाबतचे गूढ उकलण्‍यास पोलिस कसे अपयशी ठरले? सिद्धीचे कपडे, पर्स, चप्‍पल अद्याप सापडू शकले नाहीत. त्‍यादरम्‍यान तिच्‍यासोबत काय अघटित झाले, सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेतले काय? सिद्धी कधीच कळंगुट समुद्रकिनारी गेली नव्‍हती, तर अनोळखी ठिकाणी ती कशी काय गेली? तेथे अज्ञात वाहने आली होती काय? याबाबतचा उलगडा पोलिसांनी प्रामाणिकपणे व आपलीच मुलगी असल्‍याची भावना ठेवून करायला हवी होती.

मृत्‍यूचे गूढ अजूनही कायम

सिद्धीच्‍या पोटात अन्नाचा कणही नव्‍हता, पाण्‍यात बुडाल्‍याने फुफ्‍फुसात थोडे पाणी गेले होते. त्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाला असावा, असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांच्‍या पथकाने म्‍हटले आहे. तरीही त्‍याची प्रत अद्याप नाईक कुटुंबाला मिळालेली नाही. साधारण अकरा दिवस ती न देण्‍यामागील प्रयोजन काय? वास्‍तविक सोमवारी सकाळी सिद्धीने चणा मसाला व पाव खाल्लेला असतानाही तिने मृत्यूच्या आदल्‍या दिवशी काहीच खाल्ले नव्‍हते, हे कसे काय? असा प्रश्‍न सिद्धीच्‍या आईने उपस्‍थित केला आहे. त्‍यामुळे काहीतरी पाणी मुरतंय, अशी शंका उपस्‍थित होत आहे.

चार संशयितांचे काय झाले?

सिद्धीचा मोबाईल तिच्‍या कुटुंबियांनी पोलिसांच्‍या स्वाधीन केला, त्‍यादरम्‍यान कुटुंबियांनी चार संशयितांची नावे पोलिसांना दिली. पोलिसांनी त्‍यांची कसून चौकशी करणे आवश्‍‍यक आहे. तसेच त्‍यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. जर पोलिसांनी कर्तव्‍यदक्षतेच्‍या भावनेतून हे पडताळून पाहिल्‍यास सिद्धीच्‍या मृत्‍यूप्रकरणी प्रकाशझोत पडेल व कुटुंबालाही न्‍याय मिळेल. पोलिसांनी अनुत्तरीत प्रश्‍‍नांची उकल करणे आवश्‍‍यक आहे.

सिद्धी नाईकच्या मृत्यूबाबत कोणाला शंका असल्यास तिच्या मृत्यूची सखोल फेरचौकशी व्हावी आणि आवश्यकता भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

कोण हा ॲड. परब?

सिद्धीच्‍या मृत्‍यूनंतर आठव्‍या दिवशी नाईक कुटुंबियांची पुन्‍हा चौकशी करण्‍यात आली. यावेळी एका अल्‍पवयीन मुलीची ॲड. परब नामक एका व्‍यक्तीने चौकशी केली. यावेळी त्‍याने कुटुंबावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला. ‘तुझ्‍या बहिणीला तूच मारले आहे, काय ते कबूल कर, फाईल बंद करून टाकतो’ अशी दमटावणी करणे ॲड. परब यांना शोभतेय काय? तसेच कुटुंब दु:खात असताना त्‍याने अशी चौकशी करणे कितपत योग्‍य आहे. त्‍यामुळे कुटुंबिय धास्‍तावले आहे, पण अॅड. परब याने का म्‍हणून लुडबूड करावी, त्‍याला कोणी अधिकार दिला, असे प्रश्‍‍न त्‍यांच्‍या नातेवाईकांनी उपस्‍थित केले.

काही अनुत्तरीत प्रश्‍‍न

सिद्धीचे लालबुंद उघडे डोळे, नाकावर काळा-निळा व्रण, खांद्याच्‍या पाठीमागील दोन्‍ही बाजूला व्रण, मानेवरील व्रण पोलिस आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी कसे दुर्लक्षित केले? तसेच केस अजिबात विस्‍कटलेले नव्‍हते, केसांना बांधलेला क्लिप तसाच होता. मात्र, तिची जीन्सची घट्ट पँट व टॉप कसा काय निसटून गेला? हे त्‍यांच्‍या कुटुंबियांना न पटणारे आहे. तसेच मृतदेह नग्‍नावस्‍थेत असूनही रेती, दगड खरचटल्‍याचा एकही व्रण मृतदेहावर कसा काय नव्‍हता. जर लाटांच्‍या प्रवाहात मृतदेह किनाऱ्यावर आला, तर व्रण कसे काय पडले नाहीत, हे न उलगडणारे कोडे आहे. याबाबत ग्रामस्‍थ व त्‍यांच्‍या नातेवाईकांनीही संशय व्‍यक्‍त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Goa Today's Live News: रात्री १० वाजल्यानंतर लाऊड स्पीकर लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT