CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Driver: गोव्यात अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही; मुख्यमंत्र्यांचा टॅक्सीचालकांना इशारा

Goa Taxi Driver: मुरगाव बंदरात घडलेल्या घटनेची आता गोवा सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Mormugao: ‘गोव्यात पर्यटनासाठी यायचे असेल तर तुम्हाला आमच्याच टॅक्सीमधून फिरावे लागेल’, या टॅक्सीवाल्यांच्या आडमुठ्या धोरणाचा बुधवारी अमेरिकेतून आलेल्या सुमारे 100 पर्यटकांना कटू अनुभव घ्यावा लागला.

टॅक्सीवाल्यांच्या या दादागिरीमुळे या पर्यटकांना गोवा दर्शन न करताच परतावे लागले. याचे पडसाद थेट अमेरिकन दूतावासात उमटले असून त्यांनी भारतीय दूतावासाकडे तक्रार केली आहे. शिवाय जानेवारी महिन्यात येणाऱ्या तीन जहाजांचे बुकिंगही रद्द करण्यात आले आहे.

सुमारे 100 पर्यटकांना घेऊन ‘ओशियन ओडिसी’ हे जहाज बुधवारी मुरगाव बंदरात दाखल झाले. या पर्यटकांना गोवा दर्शनाला घेऊन जाण्यासाठी चार बसेस मागवल्या होत्या. मात्र, स्थानिक टॅक्सीवाल्यांनी या बसेस एमपीटीच्या गेटवरच अडविल्या.

या पर्यटकांची गोव्यात व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतलेल्या ‘ले पॅसेज टू इंडिया’ या टूर ऑपरेटर कंपनीचे व्यवस्थापक फ्रान्सिस वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसेस खरे तर बंदरावर जाऊन त्या पर्यटकांना घेऊन येणार होत्या.

मात्र, त्या गेटवरच अडवल्याने पर्यटकांना बसपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतर चालत यावे लागले. यातील काही वृद्ध पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तरीही टॅक्सीवाल्यांनी त्यांना बसमध्ये चढू न दिल्याने त्यांना नाईलाजाने जहाजावर परतावे लागले.

वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टॅक्सीवाल्यांची पोलिसांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी पोलिसांचीही पर्वा केली नाही. उलट बसचालकालाच मारहाण करून पर्यटकांना न घेता तिथून परत जाण्यास भाग पाडले. या घटनेनंतर जहाजाच्या कप्तानाने थेट अमेरिकन दूतावासाकडे तक्रार केल्याने त्या दूतावासाने भारतीय दूतावासाशी संपर्क साधून झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, अशी माहिती प्राप्त झाली.

याप्रकरणी गुरुवारी टूर ऑपरेटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन या मुजोर टॅक्सीवाल्यांना आवरा, अशी मागणी केली. दरम्यान, बुधवारी मुरगाव हार्बर टॅक्सी व्यावसायिकांनी पर्यटकांना नेण्यासाठी आलेल्या एका बसच्या चालकाला मारहाण केली असल्याची तक्रार नुनीस टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सने मुरगाव पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

पर्यटकांची पाठ

टूर ऑपरेटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक लोटलीकर यांनी, असे प्रकार भविष्यात घडल्यास पर्यटक गोव्याकडे कायमची पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, अमेरिकन पर्यटक दर्जेदार असून त्यांनी गोव्याकडे पाठ फिरवली तर त्याचे विपरित परिणाम होतील. या घटनेमुळे जानेवारीत गोव्यात येणाऱ्या आणखी तीन जहाजांचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात तीन जहाजे अमेरिकन पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार होती. मात्र या घटनेमुळे त्यांनी बुकिंग रद्द केले आहे. या घटनेची आता गोवा सरकारनेही गंभीर दखल घेतली असून अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

पर्यटकांची सतावणूक केल्यास कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी काल सायंकाळी मुरगाव पोलिस स्थानकात मुरगाव पत्तन प्राधिकरण, पर्यटक जहाजे हाताळणारी जी.एम. बक्षी कंपनी, पोलिस उपअधीक्षक, मुरगाव साहाय्यक वाहतूक संचालक, तसेच पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांची संयुक्तपणे बैठक घेतली. यापुढे गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सतावल्यास कारवाई केली जाईल, असे अधीक्षक अभिषेक धनिया यांनी बजावले.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री-

स्थानिक टॅक्सीवाल्यांकडून पर्यटकांशी झालेले वर्तन अयोग्य असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जर या टॅक्सीवाल्यांनी बसचालकाला मारहाण केली असेल तर त्यांना अटक केली जाईल.

रोहन खंवटे, पर्यटनमंत्री-

काल जो प्रकार झाला, तो दुर्दैवी असून त्याबद्दल मी स्वतः त्या पर्यटकांची माफी मागतो. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ. गुंडगिरी करणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाई करू.

अभिषेक धनिया, पोलिस अधीक्षक-

गृह विभागाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना त्रास दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. गोवा हे पर्यटकांसाठी सुरक्षित स्थळ असून अशा घटनेमुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ शकते. मुरगाव हार्बर क्रुझ जेटीवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांची योग्य ती काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT