Goa Municipalities: पेडणे नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आज पालिकेच्या सफाई कामगारांनी काम न करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले. कामगारांचे वेतन वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी हे आंदोलन केले. दरम्यान, मुख्याधिकारी अनिल राणे, नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी कामगारांकडे चर्चा करून सोमवारपर्यंत वेतन नियमित देण्याची ग्वाही दिल्यानंतर कामगारांनी आपला संप मागे घेत कामाला सुरवात केली.
पालिकेचा एक कर्मचारी आणि लेखाधिकारी कामावर वेळेवर येत नसल्यामुळे या दोघांमुळे वेतनाला विलंब होत असल्याची तक्रार यावेळी कामगारांनी मुख्याधिकारी अनिल राणे यांच्याकडे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांच्या उपस्थितीत केली.
शिवाय एक कर्मचारी सकाळीच मद्यपान करून कार्यालयात येत असल्याचीही काही कर्मचाऱ्यांनी यावेळी तक्रार केली. त्यावर मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी सोमवारी पालिकेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला नियुक्त नगरसेवक तथा आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी या विषयावर योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
...अन्यथा आंदोलन सुरूच
आम्हाला आमच्या हक्काचे वेतन वेळेवर मिळत नाही. ते वेळेवर मिळावे यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन सुरू केले. आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच आम्ही पुढील काम सुरू करणार अन्यथा हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला.
रस्त्यावर सर्वत्र कचरा...
पेडण्यात गुरुवारचा आठवड्याचा बाजार रस्त्यावर भरतो आणि शुक्रवारी कचरा साफसफाई करण्याचे काम हे कामगार करत असतात, परंतु बाजाराच्या दुसऱ्या दिवशी अचानक कामगारांनी संप पुकारल्यामुळे सगळीकडे कचरा साचलेला दिसून आला. काही स्वतःच कचरा उचलला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.