पणजी: नाताळच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करत गोव्याच्या विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला. उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई दरम्यानच्या थेट विमानसेवेला २५ डिसेंबर रोजी अधिकृतपणे सुरुवात झाली. या नवीन सेवेमुळे गोवा आणि मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून, प्रवासाचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
नाताळच्या मुहूर्तावर दुपारी २ वाजून १० मिनिटांनी आकांसा एअरलाईन्सचे (Akasa Air) पहिले विमान मोपा विमानतळावरून नवी मुंबईच्या दिशेने झेपावले. तत्पूर्वी, दुपारी पावणे दोन वाजता इंडिगोचे (IndiGo) विमान नवी मुंबईहून प्रवाशांना घेऊन मोपा विमानतळावर सुखरूप उतरले. विमानतळावर या पहिल्या विमानांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. सुट्ट्यांच्या हंगामात सुरू झालेली ही सेवा पर्यटकांसाठी आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या गोमंतकीयांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे.
उद्यापासून, २६ डिसेंबरपासून या मार्गावर नियमित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. इंडिगो, आकांसा आणि स्टार एअर या तीन प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी विविध वेळेत उड्डाणांचे नियोजन केले आहे.
मोपा (गोवा) ते नवी मुंबई (Departures):
दुपारी २:१० वाजता (स्टार एअर)
दुपारी २:२५ वाजता (इंडिगो)
दुपारी ३:४० वाजता (आकांसा एअर)
सायंकाळी ५:४५ वाजता (इंडिगो)
नवी मुंबई ते मोपा (Arrivals):
दुपारी १२:४५ वाजता (इंडिगो)
दुपारी ३:५५ वाजता (स्टार एअर)
दुपारी ४:०० वाजता (इंडिगो)
सायंकाळी ५:४० वाजता (आकांसा एअर)
गोव्यातील (Goa) जुन्या दाबोळी विमानतळावरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेक विमानफेऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, दाबोळीहून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी अद्याप थेट विमानसेवा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर मोपा विमानतळाने नवी मुंबईला थेट जोडल्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. विशेषतः नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी मोपा विमानतळ हा आता अधिक सोयीचा पर्याय ठरणार आहे.
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सध्या गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. नवी मुंबईतून थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे पर्यटकांना मुंबईतील वाहतूक कोंडी टाळून थेट दक्षिण-पूर्व मुंबई उपनगरातून गोव्यात येणे शक्य होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर आणि हॉटेल उद्योगावर दिसून येईल, असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कमी वेळेत आणि थेट विमान प्रवासामुळे प्रवाशांकडून या सेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विमानफेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.