Goa Monsoon: जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. 23 जुलै 2021 रोजी सत्तरीत महापूर येऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. यात अनेकांची घरे वाहून गेली, तर अनेकांची गुरे दगावली. शेती-बागायती पूर्णपणे उदध्वस्त झाली. शुक्रवारी दुपारी अचानक पडलेल्या पावसामुळे पुन्हा सत्तरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दरवर्षी या आपत्तीची पुनरावृत्ती होत असताना प्रशासन मात्र निद्रिस्त आहे. सरकारकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. यापुढे प्रशासनाने पुरेशी दक्षता न घेतल्यास येथील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
वाळपई शुक्रवारी सलग दोन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्रचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. बाजारात श्री हनुमान मंदिर परिसरात लोकांना पाण्यातून वाट काढताना नाकीनऊ आली. काहींची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले.
वाळपई-होंडा रस्ता पाण्याखाली गेला होता. वाळपई सामाजिक रुग्णालयासमोर पूरस्थिती निर्माण झाली. यात काहींची वाहने अडकून पडली. अग्निशमन दल व पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा निचरा केला. मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला. शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.
आपत्कालीन यंत्रणा कुठे आहे?
सत्तरीत (Salcete) सलग चार वर्षे पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने म्हादई नदी तीरावरील ग्रामस्थ, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
सध्या अधून-मधून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे स्थानिकांना पुराची चिंता सतावत आहे. अजूनही पाऊस पडत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद
दूधसागर नदीचा प्रवाह शुक्रवारी अचानक वाढल्यामुळे ४० पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. येथे पर्यटकांसाठी बांधलेला लोखंडी साकव पलटी झाला होता. त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे १६ तारखेपर्यंत दूधसागर धबधबा परिसर पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
का येतो म्हादई नदीला पूर?
गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात अचानक नदीला पूर येण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
या भागातील नागरिकांच्या मतानुसार, म्हादई नदीच्या उगमस्थानाहून कर्नाटक प्रशासनाकडून अचानक पाणी सोडले जात असल्यामुळे गोव्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते.
मात्र, यासंदर्भात गोवा सरकारने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.
सध्या तरी राज्य सरकारने पूरनियंत्रण उपाययोजना राबविलेली नाही.
सत्तरीत एका दिवसात तब्बल 4.35 इंच पाऊस
मुसळधार पावसाने शुक्रवारी सत्तरी तालुक्यातील वाळपई भागात दाणादाण उडविली. गेल्या 24 तासांत राज्यात 11.2 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर केवळ सत्तरीत तब्बल 110.5 मि.मी. म्हणजेच 4.35 इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने आज, रविवारी आणि उद्या, सोमवारी राज्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे.
आतापर्यंत राज्यात मॉन्सूनोत्तर 39.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सत्तरी हा घाटालगतचा तालुका असल्याने परतीचा पाऊस (Rain) येथे हमखास बरसतो. तापमानातील वाढ, ट्रफ्स निर्मिती तसेच वाऱ्याचा वेग या बाबी ढगफुटीसदृश पावसाला कारणीभूत ठरतात.
एकाच दिवसात तीन ऋतू
ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महिने मॉन्सूनोत्तर पावसाचे मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा अचानक कमी-जास्त होत आहे. सकाळी थंडी जाणवते, दुपारी कडक ऊन पडते, तर सायंकाळी आणि रात्री पाऊस पडतो. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली तरी बोचरी थंडी जाणवत नाही.
सातत्याने हवामानात होणारे बदल व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. तसेच वारंवार पूर येतो. क्षमतेपेक्षा जास्त पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जंगलांची कत्तल होत आहे. वाळपई (Valpoi) भागात नियोजनशून्य विकासकामे केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शहरात वारंवार पूर येतो. - राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी.
घरे वाहून गेली, शेती उदध्वस्त झाली!
गेल्या वर्षीच्या पुरात अनेक घरे जमीनदोस्त झाली. शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान झाले. हा नुकसानीचा आकडा पाच कोटींच्या आसपास होता. मात्र, अजूनपर्यंत नुकसानग्रस्तांना समाधानकारक भरपाई मिळालेली नाही, अशी तक्रार आहे. ज्यांची घरे जमीनदोस्त झाली, त्यांना घरे बांधून देण्याची घोषणा सरकारने केली होती.
सध्या तरी ही घोषणा हवेतच विरल्याचे दिसते. मात्र, स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी खडकी येथील हरिजन बांधवांची काही घरे बांधून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे अचानक पाणी येत असल्यामुळे नदीशेजारची धावे, नगरगाव, सोनाळ, सावर्डे, सावर्शे, खडकी, कुडसे, धामसे, गुळेली, वेळूस, गांजे या गावांना पुराचा धोका आहे.
शेहजीन शेख, नगराध्यक्ष, वाळपई.
गेल्या काही वर्षांपासून वाळपईत पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा आम्ही पावसाळ्यापूर्वी सर्व नदी, नाले, गटारांतील गाळ उसपला होता. मात्र, काल अचानक मोठा पाऊस आला. त्यामुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. पाण्याचा निचरा काही भागांत होत नाही. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांतर्फे वेळोवेळी याची दखल घेतली जाते.
वाळू व्यवसायापासून धोका: सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या नदीतील वाळू काढली जात आहे. त्यामुळे नदीपात्र खचूू लागले आहे. जोरदार पाऊस पडला तर नदीचा काठ कोसळण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे नदीचे पाणी गावात घुसण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने बेकायदेशीर वाळू उपशावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.