Goa Rain : डिचोली तालुक्यातील बहुतेक भागात भातपीक कापणीसाठी तयार होत असले, तरी यंदाही बळीराजाला परतीच्या पावसाची धास्ती लागली आहे. त्यामुळे भात कापणी, मळणी लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी सायंकाळी गडगडाटासह पर्जन्यवृष्टी झाली.
हवामान खात्यानेही परतीचा पाऊस पडणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. वरुणराजाने कृपा केली, तर येत्या आठवड्यापर्यंत डिचोलीत भातकापणी आणि मळणीची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. पावसाने कहर केल्यास मात्र यंदाही भातपिकाची नासधूस अटळ असल्याची शक्यता बळीराजाकडून वर्तविण्यात येत आहे.
शुक्रवारी पर्जन्यवृष्टी झाली असली, तरी पिळगाव, मये आदी मोजक्याच ठिकाणी किरकोळ प्रमाणात भातपीक आडवे झाले. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली नाही, अशी माहिती विभागीय कृषी कार्यालयातून मिळाली आहे.
पावसाची भीती
डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात यंदा 583 हेक्टर शेती भात लागवडीखाली आली आहे. साळ, मेणकूरे, मये, पिळगाव, बोर्डे, कुडचिरे आदी भागात पारंपरिक खरीप शेती लागवडीखाली आली आहे. यंदा भातपिकाचा बहार समाधानकारक असल्याने शेतकरी काहीसे खुशीत असले, तरी परतीच्या पावसाची चाहूल लागल्याने त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आट्या पडू लागल्या आहेत. गेल्यावर्षी तर ऐन कापणीच्यावेळी पावसाने कहर केला होता. पावसाच्या तडाख्यात मयेसह अन्य भागात भातपीक पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले होते. हा कटू अनुभव पाहता, यंदाही बळीराजाने परतीच्या पावसाची धास्ती घेतलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.