Taxi Driver Protest Dainik Gomantak
गोवा

सहापैकी पाच मागण्या मान्य; गोवा माईल्सचा काउंटर कायम; टॅक्सी व्यावसायिकांची राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी

Goa Taxi Operator Protest: महत्त्वाच्या पाच मागण्या पूर्ण झाल्या असून त्या लिखित स्वरूपात मिळाल्यावर टॅक्सी व्यावसायिक आंदोलन मागे घेणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Driver Protest

पणजी/पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचा काउंटर कायम राहील हे आज स्पष्ट झाले.

राष्ट्रीय महामार्ग ते विमानतळ या नव्या उड्डाणपूल रस्त्यावरील टोलमध्ये टॅक्सी व्यावसायिकांना सवलत देण्यासह सध्या विमानतळाकडे जाणारा जुना रस्ता स्थानिक टॅक्सीवाल्यांना वापरू देणे आणि विमानतळावर बेकायदेशीरपणे कार भाड्याने देण्याचे व्यवहार बंद करावे या मागण्या मान्य झाल्या आहेत. असे असले तरी गोवा माईल्सचा काउंटर हटवण्यासाठी यापुढे टॅक्सी व्यावसायिकांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

पेडण्यातील आंदोलक टॅक्सी व्यावसायिकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत जीएमआर कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आंदोलक आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत पर्वरी येथील मंत्रालयात आले. मुख्यमंत्र्यांशी १६ जणांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितले, की आंदोलकांच्या सहापैकी पाच मागण्या मान्य केल्या आहेत. गोवा माईल्सचा काउंटर हटवा ही मागणी मान्य केली जाणार नाही हे त्यांना सांगितले आहे. ही ॲपवर आधारीत टॅक्सीसेवा चांगले काम करत आहे. सरकारनेही ॲपवरील टॅक्सीसेवेला पाठिंबा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घ्यावे असे त्यांना आवाहन केले आहे. असे असले तरी लेखी स्वरूपात बैठकीतील निर्णयांची माहिती दिली जात नाही, तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

मोपावरील गोवा माईल्सचा काउंटर हटवा ही मागणी पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांची की राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिकांची असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. यामुळे पेडण्‍यातील टॅक्सी व्यावसायिक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबतच्या बैठकीचे इतिवृत्त मिळाल्यावर आंदोलन मागे घेणार की राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिकांच्या मागणीला पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवणार याविषयीची अनिश्चितता कायम आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर्त आंदोलन मागे घेऊन नंतर राज्यव्यापी आंदोलन करू असा विचार टॅक्सी व्यावसायिकांत सध्या सुरू आहे.

शिव वॉरियर्स युनाटडेट टॅक्सी ब्रदर्स असोसिएशनने दिलेल्या निवेदनात या मागणीचा समावेश होता. या मुद्यावरून आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानासमोर गोवा माईल्सचे व या संघटनेचे सदस्य समोरासमोरही आले होते. आता मात्र ही मागणी प्रमुख मागणी नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा ही कंपनीच्या कार्यालयासमोर टॅक्सी उभी करून दिली पाहिजे त्यांना काउंटर देणे बेकायदेशीर आहे असे आंदोलक टॅक्सी व्यावसायिक म्‍हणत होते.

आता त्यांनाच काउंटर मिळाल्यावर गोवा माईल्सचा काउंटर कायदेशीर कसा काय ठरेल असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता सरकारी बैठकीचे इतिवृत्त मिळाल्यावरच आंदोलक आपली भूमिका जाहीर करणार असल्याने आज रात्रीही पेडण्यातील सरकारी कार्यालय संकुलासमोर ठिय्या दिलेल्या टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन सुरूच राहिले आहे. विमानतळावरील पार्किंग शुल्कात केलेली वाढ मागे घेण्यात यावी, प्रतीक्षा कालावधी २ मिनिटांवरून १० मिनिटे करावा या त्यांच्या मागण्या शनिवारीच मान्य करण्यात आल्या होत्या. आज आणखीन तीन मागण्या सरकारने मान्य केल्या.

दरम्यान, आमच्या महत्त्वाच्या अशा पाच मागण्या पूर्ण झाल्या असून त्या लिखित स्वरूपात मिळाल्यावर आम्ही आंदोलन मागे घेणार आहोत. तोपर्यंत आमचे आंदोलन दिवस - रात्र सुरच राहील असे मोपा विमानतळ टॅक्सीधारक आंदोलकांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर पेडणे येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

उत्तर गोवा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कामत, रामा वारंग, निखिल महाले, आनंद गवस यांनी पत्रकारांना सांगितले, की स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी विमानतळावर काउंटर हवा, पार्किंग शुल्क कमी करावे, विमानतळावर भाड्याने दिल्या जाणाऱ्या खासगी वाहनमालकांवर कारवाई करावी, ॲप टॅक्सींचे विमानतळावरील काउंटर बंद करावे, महामार्ग ते विमानतळ या रस्त्याचा टोल रद्द करावा, टोल रस्ता होण्याआधीचा रस्ता खुला ठेवावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केले होते. यासाठी २२ ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरवात झाली होती. गोवा माईल्स हा संपूर्ण गोव्याचा प्रश्न असून त्याविरोधात राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक लढा देतील.

गोवा माईल्स काउंटर काढणार नाही; मुख्यमंत्री

टॅक्सी आंदोलकांनी केलेल्या सहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य केल्या आहेत. सर्व मागण्या आम्ही मान्य करू शकत नाही. टॅक्सी आंदोलकांनी गोवा माईल्स काउंटर काढण्याची केलेली मागणी मी मान्य करू शकत नाही. गोवा माईल्स टॅक्सीचालक ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे ही मागणी मी मान्य करू शकणार नाही हे त्यांना कळवले आहे. टॅक्सी आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती देखील मी केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोवा माईल्स वापरते सरकारचे नाव; आर्लेकर

पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बैठकीत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोवा माईल्स आपल्या फलकांवर गोवा सरकारचे नाव वापरत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. सरकारने आपले नाव फलकांवरून हटविण्याचा आदेश गोवा माईल्सला द्यावा अशी मागणी आर्लेकरांनी केली. दरम्यान, त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

मान्य झालेल्या मागण्या

टॅक्सी आंदोलकांनी केलेल्या मागण्यांमध्ये टोल सूट, विद्यमान रस्ता खुला ठेवणे, पार्किंग फी कमी करणे, पेडणे टॅक्सीचालकांसाठी वेगळे काउंटर या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अजून बैठकीचे मिनिट्स न मिळाल्याने टॅक्सी आंदोलकांनी पाचवी रात्रही आंदोलनस्थळीच काढली.

आमदार आरोलकर यांची तळमळ अमान्य?

आपण किनारी भागातील आमदार असल्याने माझ्या मतदारसंघातील टॅक्सीचालकही आंदोलनात होते. मला त्यांची काळजी वाटत असल्याने मी त्यांना आंदोलन ठिकाणी भेटायला गेलो. त्यांच्याशी चर्चा देखील केली, असे आमदार जीत आरोलकर यांनी पत्रकारांना सोमवारी सांगितले. मात्र, जीत यांची ही तळमळ कदाचित टॅक्सी आंदोलकांना मान्य नसल्याने टॅक्सी आंदोलकांनी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही आमदार जीत आरोलकर यांना बैठकीला बोलावले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjuna Theft: गोव्यात सुपर मार्केटमध्ये केली चोरी, थेट सापडला नेपाळ बॉर्डरवर; संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Rain: गोवेकर काळजी घ्या! जोरदार पाऊस, उंच लाटांची शक्यता; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

Pernem Malpe: चालकाला टॅक्सीतून बाहेर काढले, धारदार शस्त्रांनी केला हल्ला; पेडणे प्रकरणातील तिघे संशयित ताब्यात

Govind Gaude: गोविंद गावडेंचे सरकारवर शरसंधान! अर्थसंकल्प, समाजकल्याण खात्याबद्दल केले मतप्रदर्शन

POP Ganesh Idol: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर गोव्यात बंदी! चित्रशाळांची होणार संयुक्त तपासणी; कडक कारवाईचे निर्देश

SCROLL FOR NEXT