Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: रेड अलर्ट जारी; 9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार, आज शैक्षणिक संस्थांना सुटी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update 2023 राज्यात बुधवारी १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असून सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

हवामान खात्याने गुरुवारी राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे. नाकेरी-बेतूल येथे ओहोळात एक महिला वाहून गेल्याने खळबळ उडाली असून तिचा शोध सुरू आहे.

शिक्षण खात्याने जारी केलेल्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे की, मुसळधार पावसाच्‍या शक्‍यतेमुळे गुरुवार, ६ रोजी बारावीपर्यंतच्‍या शाळांना, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुटी असेल.

तर राज्‍यातील महाविद्यालयांनाही सुटी असेल. तथापि, जिथे परीक्षा सुरू आहेत, तेवढेच वर्ग गुरुवारी सुरू राहतील, असे परिपत्रक उच्‍च शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते उत्तर केरळच्या किनाऱ्यापर्यंत समुद्र सपाटीजवळ ऑफ-शोअर ट्रफ तयार झाला आहे. त्यातच उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्याला लागून उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोव्यात वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटर झाला आहे. यामुळे पहाटेपासूनच राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे.

कोठे काय घडले?

  • डिचोली-साखळी रस्त्यावर झाड पडले; मात्र, दोन महिला बचावल्या.

  • मालपे येथे पुन्हा दरड कोसळली; वाहतुकीला धोका.

  • सांगेत नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ.

  • पिळगावात घरावर पडले झाड.

  • काणकोणात शेती-बागायतींमध्ये शिरले पाणी.

  • काणकोणात वीज खात्याचे पडझडीमुळे ६ लाखांचे नुकसान.

  • गालजीबाग येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तळ्याचे स्वरूप.

  • मडगाव पालिका इमारतीमध्ये गळती; दस्तऐवजांना धोका.

  • मुरगावमध्ये अनेक घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी.

9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ९ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्यात ''रेड अलर्ट'' जाहीर केला होता. मात्र, गुरुवारीही हवामान खात्याचे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पाय घसरून ओढ्यात पडली अन्...

नाकेरी-बेतूल येथे आज, बुधवारी सकाळी शेतीकामासाठी गेलेली फ्लोरिना डिसोझा (५६) ही कट्टा-फातर्पा येथील महिला पाय घसरून ओढ्यात पडली.

पाण्याला प्रचंड वेग असल्याने ती लगेच वाहून गेली. यावेळी तिची बहीण रोझालीना सिमोईस (५०) हीदेखील वाहून जात होती. मात्र, तिने तेथील झाडाला घट्ट पकडल्याने तिचा जीव वाचला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी बोट घेऊन बेपत्ता फ्लोरिनाचा शोध सुरू केला. पण रात्री उशिरापर्यंत तिचा थांगपत्ता लागला नव्हता. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हेही घटनास्थळी उपस्थित होते. आज सकाळपासून संततधार पाऊस पडत असल्याने शोधकार्यात व्यत्यय येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिना ही फातर्पा येथे राहात असून तिची बहीण रोझालीना ही नाकेरी-बेतूल येथे राहते. त्यांचे नाकेरी येथे शेत असून तिथेच काम करण्यासाठी त्या दोघी गेल्या होत्या.

या शेताच्या वाटेवरच ओढा आहे. गेले दोन दिवस संततधार पाऊस पडल्याने हा ओढा तुडुंब भरून वाहू लागला आहे. शेतात पाषाणी दगडाच्या वाटेवरून जावे लागते. या दगडावरून त्या दोघींचा पाय घसरून त्या ओढ्यात पडल्या.

पाण्याला वेग असल्याने त्या दोघी वाहून जाऊ लागल्या. मात्र, रोझालीनाच्या हाताला एक झाड लागल्याने तिने त्या झाडाला घट्ट धरून स्वतःचा जीव वाचविला. पण फ्लोरिना वाहून गेली.

हा ओढा थेट साळ नदीला मिळतो. नंतर नदी समुद्राला मिळते. याच ओढ्याच्या वाटेवर एका चिरेखाणीचा डोह आहे. या डोहात ती आहे का, याचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT