Goa: गोव्यात संस्कृतीचा प्रचंड गाजावाजा केला जातो. त्याला सरकारही चटकन भुलते. त्यातून अनेक भागात रवींद्र भवने साकारली आहेत, पण पुढे काय? चिमुकल्या गोव्यात अशी किती भवने हवीत त्याचा विचार वा अभ्यास त्यासाठी केला जात नाही.
पेडणे तालुक्यात पेडणे व मांद्रे अशा दोन ठिकाणी रवींद्र भवनासाठी मागणी आहे. जागा अजून निश्चित झालेली नाही व त्यामुळे आमदार जीत आरोलकर यांनी ताजमहालाच्या नावे केलेले विधान हे रवींद्र भवनाला उद्देशून तर नव्हे ना? असा संशय अनेकांना आला. मात्र, त्यातून त्यांना नेमके रवींद्र भवन हवे की नको ते स्पष्ट होत नाही.
कोकणी म्हालगड्यांच्या पंक्तीत मराठीचा गजर!
गोव्याला भाषिक वैर नवीन नाही. जनमत कौलापासून आजपर्यंत कोकणी - मराठीचे वैर संपलेले नाही. कोकणीवादी मराठीप्रेमींना पाण्यात पाहतात, तर मराठीप्रेमी आजही कोकणी ही बोली भाषा म्हणून हिणवतात. मात्र, दोन दिवसांमागे कमालच झाली.
कोकणी म्हालगड्यांच्या पंक्तीत मराठीचा गजर ऐकायला मिळाला. गोव्यात एका साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मराठी कवीने कोकणी म्हालगड्यांच्या पंक्तीत मराठीचा गजर केला. मराठी कवितांचा पाऊस पाडला. या रात्रीच्या संमेलनात मात्र कोकणी व मराठीचा खूप रंग जमला. काही का असेना भाषिक वैराची दरी कमी होतेय हेच खरे.
महामार्गाचे चौपदरीकरण?
सध्या काणकोण तालुक्यात लोकोत्सवाचे वातावरण आहे. या उत्सवात दिल्लीपासून गोव्यापर्यंत अनेक रतीमहारथींनी उपस्थिती लावली. या उत्सवातील कार्यक्रमात बाळ्ळी ते चाररस्ता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित होणे साहजिकच होते, पण त्यावर स्पष्टीकरण करताना मुख्यमंत्री व साबांखामंत्री यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जी वेगवेगळी कालमर्यादा सांगितली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी लोकोत्सवापूर्वी शक्य नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी हे चौपदरीकरण व्हावे अशी या रस्त्याचा वापर करणाऱ्यांची भावना आहे.
दुसरी याचिका नेमकी का?
तीन महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झालेल्या आठ काँग्रेस आमदारांविरुद्ध आणखी एक अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल झालेली आहे. त्यासाठी प्रथम माजी व नंतर आजी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. तेवढ्याने भागलेले नाही, तर या दोन्ही याचिका फेटाळल्या गेल्या, तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पण मुद्दा तो नाही, माजी अध्यक्षांनी अगोदर एक याचिका दाखल केलेली असताना व त्याची नोंद घेऊन सभापतींनी प्रतिवादींना नोटिसा जारी केलेल्या असताना अध्यक्षांना वेगळी याचिका दाखल का करावीशी वाटली असा प्रश्न काँग्रेसवालेच आपसात करत आहेत. तर काहींच्या मते आजी माजीवाल्यांमध्ये पटत नसल्याचा हा परिपाक आहे.
नवीन समीकरणे!
मोपा आतंरराष्ट्रीय विमानतळास भाजपा नेते स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जाणार अशा बातम्या आज समाज माध्यमांवर फिरू लागल्या. त्यामुळे भाजपा गोटात खुशी पाहायला मिळाली.
मात्र, भाऊप्रेमी हिरमुसले! नामकरण समितीने या विमानतळास भाऊंचेच नाव दिले जावे यासाठी बराच आवाज उठवत आंदोलने तसेच निदर्शने केली, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही! अशावेळी नामकरण समिती व भाऊप्रेमींची पुढील दिशा व पाऊल काय असेल हे पाहावे लागेल.
याशिवाय भाजपा पक्ष म्हणून ही स्थिती व लोकभावना कशापद्धतीने हाताळणार यावर पुढील नवीन राजकीय समीकरणे व राजकारण बरेच अवलंबून असेल, एवढे मात्र नक्की! तसेच मगो पक्षाचीसुद्धा कसोटी लागणार आहे, हेही तितकेच खरे!
दौलतीवर त्यांचाही हक्क!
कला अकादमीचा ताजमहाल कधी बनेल हे सांगता येत नसले, तरी त्यात एकापेक्षा एक शहेनशहांची चलती मात्र सुरू आहे असे ऐकिवात येते आहे. दोन शहेनशहा मावसबंधू तर आपल्या कुटुंबाचे भले करण्यात गुंतलेले आहेतच, त्याशिवाय आणखी एक फोंड्याचा शहेनशहा लेक्चर बेसिसवर मिळणाऱ्या मानधनाची विशिष्ट मर्यादा असताना देखील त्याच्या दुपटीने मानधन दर महिन्याला मिळवत आहे. हे सारे मिनी शहेनशहा मुख्य शहेनशहाची हुजरेगिरी व्यवस्थित करत असल्याने दौलतीवर त्यांचाही हक्क पोहोचतोच, नाही का?
फुटीचा मसुदा करणाराच खटला लढणार?
मागे आठ आमदार काँग्रेस सोडून भाजप पक्षात गेले, त्यावेळी आता मागे राहिलेल्या एका आमदारानेच फुटीचा मसुदा तयार केला होता असे आरोप होत होते. आता भाजप पक्षात विलीन झालेल्या त्या आठ आमदारांविरोधात काँग्रेसने अपात्रता याचिका दाखल केली आहे.
असे म्हणतात त्यावेळी ज्याने पूर्वी फुटीचा मसुदा तयार केला, तोच आता काँग्रेसचा खटला लढण्याची शक्यता आहे. या वृत्तात तथ्य आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. मात्र, काँग्रेस हाउसमध्ये तशी चर्चा जरूर आहे.
पणजीतील रस्ते बनले ‘चेंजिंग रूम’!
पणजीतील प्रमुख रस्त्यांचे खोदकाम सध्या सुरू असून नागरिकांची गैरसोय होत आहे, परंतु पणजीत येणाऱ्या पर्यटकांना याचा काही त्रास होत नसून ते वेगळ्या कामासाठी पणजीतील रस्त्यांचा वापर करत आहेत. असाच एक प्रकार आझाद मैदान येथे घडला.
आपल्या एसयूव्हीमधून कपडे काढून थेट रस्त्यावरच बदलण्याचा प्रकार राजधानीत खुलेआमपणे घडत होता. गंमत म्हणजे पोलिस मुख्यालय आझाद मैदानाच्या दुसऱ्या बाजूलाच आहे. परंतु पर्यटकांच्या या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष गेले नाही हे आश्चर्यच. आता गोव्यात येऊन काहीही करा हा नवीन ट्रेंड पर्यटकांत रुजलाय हेच खरे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.