सासष्टी: ख्रिस्ती बांधवाच्या नाताळ सणाला केवळ एक दिवस बाकी असताना मडगावात या उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मडगावातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. न्यू मार्केटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाल्याने रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
सासष्टी तालुक्यातील मडगाव ही मोठी बाजारपेठ असल्याने या तालुक्यातील किनारपट्टी भागातील वार्का, बाणावली, कोलवा, बेताळभाटी, केळशी, असोळणा येथील ख्रिस्ती बांधव खरेदीसाठी मडगावात येतात. त्यामुळे गर्दी जास्तच वाढते. कपडे, सजावट, विद्युत रोषणाई, खाद्यपदार्थांसारख्या दुकानांची गर्दीच दिसत आहे. केवळ मडगाव मार्केटमध्येच नव्हे तर आके, बोर्डा, नावेली या भागातही सजावटीची, नक्षत्रे दुकाने रस्त्याच्या बाजूला सुरू केली आहेत.
नाताळच्या सणानिमित्त बाजार विविध साहित्याने सजला आहे. व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक साहित्य विक्रीसाठी आणले आहे.
यंदा प्रत्येक वस्तूची किंमत मात्र वाढलेली आहे. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे मुखवटे, तयार गोठेही बाजारात विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.
यंदा ख्रिस्ती बांधव ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे मुखवटे जास्त प्रमाणात खरेदी करीत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. मडगावच्या न्यू मार्केटमध्ये करंज्या, केक, बेबिंका, दोस व इतर गोड पदार्थ विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.
मडगावमध्ये ख्रिस्ती बांधवांनी आपापल्या घरांना रंगरंगोटी केली आहे. काही घरांमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ बनविण्यात येत आहेत. आजपासून मुलांना नाताळची सुट्टी सुरू झाल्याने मुलेही नाताळ साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत.
बोरीत गोठे सजले; घरांवर आकर्षक सजावट
बोरी गावातील ख्रिश्चन बांधवांनी नाताळ सणानिमित्त आपापल्या घरात व अंगणात येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित गोठे सजवले असून गोठ्यात येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील मूर्ती ठेवल्या आहेत. तसेच बहुतेकांनी ख्रिसमस ट्रीच्या रंगीत प्रतिकृती ठेवल्या आहेत. अनेकांनी आपल्या घरावर आकर्षक तारे, नक्षत्रे आणि विद्युत रोषणाई केलेली आहे.
कोंब येथे विद्युत रोषणाई
वर्षपद्धतीप्रमाणे ए चिराग दत्ता नायक इनिशिएटीव्हने कोंब, मडगाव येथे रोषणाई करण्यात आली आहे. सांताक्लॉज, गोठा तयार करण्यात आला आहे.या रोषणाई व कलाकृतीचे उद्घाटन २० डिसेंबर रोजी मडगावमधील प्रसिद्ध डॉ. आंतोनियो रॉड्रिग्स यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही रोषणाई व कलाप्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत खुले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.