Arpora : मागील काही दिवसांत कळंगुट येथील 10-15 बेकायदेशीर नाईट क्लबवर प्रशासनाने कारवाई केल्याने डान्सबार चालक चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी आपला व्यवसाय हणजूण हडफडे सारख्या किनारी भागात स्थलांतरित करण्याची तयारी केली असल्याची बातमी पसरली आहे.
त्याबाबत पत्रकारांनी हडफडे सरपंचांची भेट घेऊन त्यांना य सर्व प्रकरणाबद्दल विचारणा केली असता सरपंच रोशन रेडकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
सरपंच रेडकर म्हणाले कळंगुट मधील बेकायदेशीर डान्सबार, क्लब यांच्यावर सरकारने कारवाई करून मोठं आणि महत्वाचं काम केलंय. आमच्या गोव्याचे आणि आमच्या गावाचे नाव खराब करणाऱ्या गोष्टींना आम्ही थारा देणारा नाही.
आम्ही आमच्या बाजूने याचा कडाडून विरोध करत आहोत. विशेष म्हणजे हडफडे ग्रामस्थांचा पंचायतीला पूर्णतः पाठिंबा असून हणजूण पीआय प्रशाल देसाई आणि पोलिस पथकही याकामी महत्वाची कामगिरी बजावत आहेत.
4 वर्षांपूर्वी प्रस्ताव आला होता:-
4 वर्षांपूर्वी 'स्पा' उघडण्याचे प्रस्ताव पंचायतीकडे आले होते. मात्र आम्ही त्यावेळपासून आमचा बेकायदेशीर कृत्यांना विरोध असून अशा घटनांबद्दल पंचायत कायम सतर्क आहे.
कायदेशीर संगीत पार्ट्या करणाऱ्यांसाठी आम्ही नक्कीच प्रोत्साहन देऊ मात्र बेकायदेशीर स्पा, मसाज पार्लर, डान्सबार अशा चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीला आम्ही थारा देणार नसल्याचे सरपंचांनी सांगितले.
कळंगुटमधील 'तो' प्रकार आमच्या भागात होणार नाही:-
शनिवारी जो कळंगुट मध्ये मारहाणीचा प्रकार झाला तसा प्रकार आमच्या भागात होणार नसून आम्ही येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क आहोत.
तसेच आमच्या ग्रामस्थांनाही याची जाणीव असून तेही अशा गैर कृत्यांना थारा देणार नसल्याची माहिती सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.