गोवा

Goa News: काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या विद्यार्थी संघटनेचा ऐतिहासिक विजय, अभाविपला धोबीपछाड; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याच्या ऋषिकेश ढवळीकरचा राष्ट्रीय स्तरावर डंका

एनसीईआरटी (NCERT) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'राष्ट्रीय कला उत्सव २०२५' मध्ये गोव्याचा उदयोन्मुख कलाकार ऋषिकेश ढवळीकर याने सुवर्णमयी कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील शास्त्रीय गायन विभागात ऋषिकेशने आपल्या सुमधुर स्वरांनी परीक्षकांना मंत्रमुग्ध करत द्वितीय क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्तरावर गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा संताप; पिक-अप शुल्कावरून गेट रोखले, पर्यटकांचे प्रचंड हाल

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथे जीएमआर (GMR) प्रशासनाने लागू केलेल्या नवीन पिक-अप शुल्कामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिक-अपसाठी प्रत्येक वाहनामागे २१० रुपये शुल्क आणि केवळ दोन मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित केल्याच्या निषेधार्थ टॅक्सी चालकांनी विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार रोखून धरले. या अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या विद्यार्थी संघटनेचा ऐतिहासिक विजय, अभाविपला धोबीपछाड

गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषद (GUSC) निवडणुकीत काँग्रेसची विद्यार्थी शाखा 'NSUI' आणि गोवा फॉरवर्डची विद्यार्थी शाखा यांनी एकत्र येत दणदणीत विजय मिळवला आहे. १६ डिसेंबर रोजी होणारी ही निवडणूक जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली होती, जी अखेर २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. या निवडणुकीत विरोधी गटाच्या युतीने भाजपप्रणित अभाविपचा (ABVP) पराभव करत बहुतांश महत्त्वाच्या जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

वास्को पोलिसांची मोठी कामगिरी! मांगोर हिलवरून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलीचा दिल्लीत लागला शोध

वास्को पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि समन्वित मोहीम राबवत, गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या एका १६ वर्षीय मुलीचा दिल्लीतून शोध लावून तिला सुखरूप गोव्यात आणले आहे. १६ डिसेंबर २०२५ रोजी मांगोर हिल येथील सरकारी हायस्कूल जवळून ही मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १३७ आणि गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

बनावट 'एनओसी' प्रकरण; अजय गुप्ता यांची रवानगी म्हापसा पोलिसांच्या ताब्यात

लुथरा बंधूंचा व्यावसायिक भागीदार असलेला संशयित आरोपी अजय गुप्ता याच्या अडचणीत वाढ झाली असून, म्हापसा न्यायालयाने त्याला तपासासाठी म्हापसा पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राची बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, त्याआधारे उत्पादन शुल्क परवाना मिळवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अजय गुप्ता याला कालच न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी म्हापसा पोलिसांनी त्याचा ताबा मागितला होता, जो न्यायालयाने मान्य केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे उत्पादन शुल्क विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने पोलीस आता अजय गुप्ताची कसून चौकशी करणार आहेत.

शेतकरी सन्मान दिवस; सभापती डॉ. गणेश गांवकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन

केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (CCARI), गोवा आणि कृषी विज्ञान केंद्र (KVK), उत्तर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छता पंधरवाडा २०२५' अंतर्गत 'शेतकरी सन्मान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शेतीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि सर्वोत्तम पद्धतींवर आधारित एका विशेष परस्परसंवादी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गोव्याचे माननीय सभापती डॉ. गणेश गांवकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी आधुनिक शेतीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा असल्याचे प्रतिपादन केले.

हडफडे आग प्रकरण: दोन मॅनेजर्सना सशर्त जामीन मंजूर, जनरल मॅनेजरचा अर्ज फेटाळला

हडफडे येथील भीषण आग प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेत आज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी प्रियांशु ठाकूर आणि राजवीर सिंघानिया या दोन मॅनेजर्सना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य जबाबदारी असलेले जनरल मॅनेजर विवेक सिंग यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

बी. एल. संतोष आज गोव्यात

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आज गोव्यात. मंत्री, भाजप आमदार, कोअर समितीच्या पदाधिर्‍यांसोबत आज रात्री घेणार बैठका.

'लोकोत्सवा'साठी विक्रेत्यांची पहाटेपासूनच लगबग

गोव्यातील बहुप्रतिक्षित सांस्कृतिक महोत्सव 'लोकोत्सव २०२५' (Lokotsav 2025) च्या तयारीला वेग आला असून, स्टॉल्स मिळवण्यासाठी विक्रेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. पणजीतील कला आणि संस्कृती विभागाच्या कार्यालयाबाहेर आज पहाटेपासूनच शेकडो विक्रेत्यांनी रांगा लावल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या हस्तकला, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन मांडता यावे, यासाठी गोव्यातील स्थानिक कारागिरांसह परराज्यातील विक्रेत्यांनीही मोठी गर्दी केली आहे.

६ वर्षीय शाळकरी बालिकेचा विनयभंग; स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पर्वरी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेत ने-आण करणाऱ्या एका ४७ वर्षीय स्कूल व्हॅन चालकाला सहा वर्षांच्या बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी हा पर्वरी-सुकूर येथील २० पॉईंट परिसरात, रास्तोळी देवस्थानजवळ राहणारा असून तो एका खाजगी 'इको' स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करत होता.

तोतया पोलिसांनी पिळगावच्या महिलेला 6 लाखांना लुटले; मंगळसूत्र घेऊन पोबारा

डिचोली तालुक्यातील पिळगाव येथील एका महिलेची 'तोतया पोलिसांनी' ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

"परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला आहे, तुम्ही दागिने अंगावर घालणे सुरक्षित नाही," असे सांगून त्यांनी महिलेला तिचे मंगळसूत्र काढून ठेवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर मोठ्या शिताफीने त्यांनी ते दागिने एका कागदात गुंडाळून तिला परत केल्याचे भासवले. मात्र, घरी जाऊन पाहिल्यावर त्या पाकिटात मंगळसूत्राऐवजी दगड असल्याचे पाहून महिलेला धक्का बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhan Rajyog 2026: नवीन वर्ष 'या' 3 राशींसाठी ठरणार 'गोल्डन पीरियड'; शनिदेव देणार अपार धनदौलत आणि मान-सन्मान

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, पणजी 'पोक्सो' कोर्टाचा आरोपीला दणका; खटला चालवण्याचा दिला आदेश

Viral Video: फॅशन शोमध्ये टाळ्यांचा कडकडाट थांबला अन् अचानक किंकाळी घुमली, पुढं काय झालं ते तुम्हीच बघा? मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल

मैदानावर 'फ्लॉप', रिसॉर्टमध्ये 'टॉप'; नऊपैकी सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत होते इंग्लिश खेळाडू, मॅनेजरच्या खुलाशानं क्रिकेट जगतात खळबळ

मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा एल्गार! 210 रुपये 'पिक-अप' शुल्कावरून राडा; प्रवाशांचे अतोनात हाल

SCROLL FOR NEXT