Goa Marathi Academy : फोंड्यातील पत्रकार गोकुळदास मुळवी यांनी लिहिलेल्या ‘सत्य शोधताना‘ या पुस्तकातून त्यांनी आपल्या जीवनात किती खडतर मेहनत घेतली आणि ध्येय साध्य करण्यासाठी किती कष्ट उपसले हे दर्शवले असून आजच्या युवकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे मत फोंड्यातील ज्येष्ठ कलाकार धर्मानंद गोलतकर यांनी व्यक्त केले.
फोंड्यात विद्या वृद्धी संस्थेच्या सभागृहात रविवारी गोवा मराठी अकादमीच्या फोंडा प्रभागातर्फे आयोजित साहित्य अभिवाचन संवाद शृंखला कार्यक्रमात गोकुळदास मुळवी यांच्या ‘सत्य शोधताना’ या पुस्तकावर चर्चा झाली, त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलाकार धर्मानंद गोलतकर उपस्थित होते.
विद्या वृद्धी संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला पुस्तकावर भाष्य करणारे पत्रकार सदानंद सतरकर तसेच नाट्य कलाकार नितीन कोलवेकर, विद्या वृद्धीचे अध्यक्ष उदय डांगी व
गोवा मराठी अकादमीच्या फोंडा प्रभागाचे अध्यक्ष नीलेश नाईक व पदाधिकारी हनुमंत नाईक, अंजला मुळवी, ॲड. मनोहर आडपईकर, गायक कलाकार रघुनाथ फडके आदी उपस्थित होते.
धर्मानंद गोलतकर म्हणाले, स्पष्टपणे बोलणारे आणि परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा असलेले गोकुळदास मुळवी यांनी आपल्या बालवयात खूप कष्ट घेतले.
एक यशस्वी शिक्षक, एक कुशल सरपंच आणि एक उत्कृष्ट पत्रकार अशी ओळख त्यांनी जनमानसात केली, जी आजच्या युवकांसाठी आदर्शवत आहे.
चांगले ते स्विकारावे आणि वाईट ते सोडून द्यावे अशी त्यांची धारणा आहे. माणसाने जीद्द सोडता कामा नये, असे सांगताना खरे ते बोलावे आणि चांगले ते स्विकारावे असा संदेश मुळवी यांनी आपल्या पुस्तकातून दिला आहे.
सदानंद सतरकर यांनी गोकुळदास मुळवी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मानदंड तयार केला, ज्यामुळे आज या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरू शकतो. आपल्या सत्य शोधताना या पुस्तकातून त्यांनी जीवनातील खडतर प्रवासाचे वर्णन केले असून त्यातून प्रत्येकाने बोध घ्यायला हवा.
फोंड्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा निवृत्त शिक्षक व बांदोडा पंचायतीचे सरपंचपद भूषवलेले गोकुळदास मुळवी यांनी लिहिलेल्या ‘सत्य शोधताना‘ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली आहे.
त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली असून ‘तू आई आहेस का’ या नाटकामुळे त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख झाली. या साहित्य संवाद कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावली होती.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
नितीन कोलवेकर म्हणाले, गोकुळदास मुळवी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याकडून शिकून घेण्यासारखे बरेच काही आहे. आपल्या सत्य शोधताना या पुस्तकातून त्यांनी प्रयत्न करण्याची जिद्द प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असा संदेश दिल्याचे सांगितले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोकुळदास मुळवी उपस्थित राहू न शकल्याने नरेंद्र तारी यांनी या पुस्तकावर अभिवाचन केले. प्रास्ताविक नीलेश नाईक यांनी केले. सूत्रसंचालन राधा गाड यांनी तर उदय डांगी यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.