पणजी: राज्यातील बेवारस व पडीक जमीन हडपप्रकरणी खळबळ माजवलेल्या मुख्य संशयितांच्या यादीत समावेश असलेल्या संशयित महम्मद सुहेलला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन दिला. हल्लीच त्याला एसआयटीने केपे येथून अटक केली होती. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणीचे १४ गुन्हे दाखल झाले आहेत.
संशयित सुहेल याला २० हजार रुपयांचा जाचमुचलका व तत्सम रक्कमेचा एक स्थानिक हमीदार सादर करणे आवश्यक आहे. जामिनावर सुटल्यावर पुढील सात दिवस एसआयटी पोलिस स्थानकात हजेरी लावणे, पुराव्यांशी छेडछाड करण्यापासून, साक्षीदारांशी संपर्क साधण्यापासून किंवा न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय गोवा सोडण्यापासून प्रतिबंधित केले आहे. जामिनावर असताना अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
संशयित महम्मद सुहेलचा गोव्यात कायमस्वरुपी पत्ता नाही. तो भाडेपट्टीवर गोव्यात राहतो त्यामुळे जामीन मिळाल्यास पुन्हा फरारी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, अशी बाजू सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध करताना मांडली.
या प्रकरणातील मुख्य संशयित सँड्रिक याला अजून अटक करायची आहे. यापूर्वी सुहेलला अटक झाली तेव्हा त्याला सशर्त जामीन दिलेला आहे. काही प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र सादर केले आहे. तो तपासात पोलिसांना सहकार्य करत आहे, अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली.
संशयितावर दाखल गुन्ह्यात कलम ४२० वगळता इतर सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. निर्दोषत्वाचा अंदाज संशयिताच्या बाजूने असून सशर्त सोडता येणे शक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.