पिसुर्ले/सासष्टी: राज्यात रविवारी झालेल्या विविध ग्रामसभांमध्ये पाणीटंचाई, बेकायदेशीर प्रकल्प, ड्रग्सचा विळखा, वाढते शहरीकरण, बंदर प्रकल्पांना विरोध असे गंभीर मुद्दे उपस्थित झाले. तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली.
होंडा ग्रामसभेत सोनशी भागात पाण्याची तीव्र टंचाई आणि बंद खाणींच्या परिसरात रात्री-अपरात्री अनोळखी युवकांचा वावर वाढल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सुमारे पन्नासेक युवक दुचाकींवरून फिरत असून ड्रग्स वापर होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
तसेच कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देत पोलिस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली. सरपंच शिवदास माडकर यांनी संबंधित खात्यांकडे पत्रव्यवहार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.
दवर्ली-दिकरपाल ग्रामसभेत सरकारच्या शहरीकरण व ‘पीडीए’अंतर्गत आणण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. पंचायत अधिकार कमी करून सचिवांकडे देण्याच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
आमच्या भागाचा नगरपालिकेत समाविष्ट करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असल्याचे सरपंच मिनीन कुलासो यांनी सांगितले.
लोटली ग्रामसभाही गाजली. ग्रामस्थांनी सांगितले की, वेर्णा येथे पंचायतीचा परवाना न घेताच क्रिकेट मैदान बांधण्यात आले आहे.
आता आणखी २५ हजार चौरस मीटर जागा क्रिकेट अकादमीसाठी ‘इनव्हेस्टमेंट प्रोमोशन एरिया’ म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
तेथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्याबरोबरच निवासी सदनिका बांधण्याचाही प्रस्ताव आहे. २०२३ साली क्रिकेट मैदानासाठी या पूर्वीच्या पंचायतीकडून परवाना घेतला गेला, पण त्यात एक अट अशी होती की रूपांतर प्रमाणपत्राशिवाय काम सुरू करू नये. पण त्यांनी मैदानाचे काम पूर्ण केले, उद्घाटन केले व पंचायत काहीच करू शकली नाही, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
केळशी पंचायतीच्या ग्रामसभेत प्रस्तावित बेतूल बंदर प्रकल्पाला पूर्ण विरोध दर्शवला. २०१९ मध्ये रद्द झालेला बंदर आराखडा पुन्हा पुढे आणल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तसेच मोबोर जेटीवरील बेकायदेशीर लोडिंग-अनलोडिंगविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामस्थांनी बंदराचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी केली असल्याची माहिती सरपंच डिक्सन वाझ यांनी नंतर पत्रकारांना दिली. ग्रामसभेत भटक्या कुत्र्यांवरही चर्चा झाली. वाझ यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून केळशी पंचायत क्षेत्रातील किनारी भागात कुत्रा चावल्याची घटना घडलेली नाही. तरीसुद्धा आम्ही सर्व भटक्या कुत्र्यांना एकत्र आणून निवारा घरात ठेवले आहे.
होंडा परिसरातील काही अडगळीच्या ठिकाणी अनोळखी मुलांचा वावर वाढला आहे. सोनशी भागातील बंद असलेल्या खाणींच्या क्षेत्रात रात्री-अपरात्री सुमारे पन्नासेक युवक दुचाकी घेऊन फिरत असतात.
त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे होंडा पंचायत क्षेत्रात इतर भागातही अनोळखी युवकांचा वावर वाढला असून संशयास्पद व्यवहार होत आहेत. या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत लावून धरली.
नोव्हेंबर महिन्यात लोटली ग्रामसभेत क्रिकेट मैदानावरील बांधकाम पाडावे व परवाना रद्द करावा असा ठराव मंजूर केला होता. लोटली पठारावर वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी बोअर विहिरी खोदल्या आहेत. त्यामुळे आमच्या विहिरी आटल्या, तळ्यातील पाणी नाहीसे झाल्या. पाण्यासाठी हाल-अपेष्टा सोसाव्या लागतात, असेही संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.
लोटली पंचायतीच्या ग्रामसभेत वेर्णा येथील क्रिकेट अकादमी प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला. रूपांतर प्रमाणपत्राशिवाय मैदान बांधल्याचा आरोप करत हा प्रकल्प रद्द करण्याची व गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. सरपंच रायलन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामसभा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.