Govind Gaude कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्यानंतर आपल्याला नाहक ‘टार्गेट’ केले जात आहे, असा दावा करणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांनी आज माध्यमांना दिलेल्या काही उदाहरणांवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘अटल सेतूच्या कामातही अनेक गोष्टी झाल्या; पण तो घोटाळा आहे, असे कुणी म्हटले नाही. एका खात्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याची हेडलाईन एका दैनिकात प्रसिद्ध झाली’, असे गावडे उद्वेगात उदगारले. हे वक्तव्य म्हणजे सरकार पक्षाला घरचा अहेर आहे, असा अन्वयार्थ काढला जात आहे.
‘भाजप सरकारने अटल सेतूच्या बांधकामात केलेला भ्रष्टाचार मंत्री गावडे यांनी उघड केला’, असे म्हणत काँग्रेसने कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले आहेत. काँग्रेसचे मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकांनी गावडे यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे.
आपल्याच सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पाहूनही अनेकजण मौन बाळगतात; पण मंत्री गावडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. सत्ताधारी आमदार स्वतःचे सरकार कसे भ्रष्टाचार करते, हे उघडकीस आणले आहे.
दरम्यान, गावडे यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाची आठवण करून देत अप्रत्यक्षरीत्या अबकारी खात्यातील अपहाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, अशीही चर्चा आहे. अबकारी खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.