Government Jobs| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Government: सरकारला घेरणार... 'खरी कुजबुज'

विद्यमान सरकार आम्ही अमुक नोकऱ्‍या देणार असे वेळोवेळी सांगते.

दैनिक गोमन्तक

Goa Government: सरकारी नोकरभरती हा तसा संवेदनशील व धगधगता विषय. विद्यमान सरकार आम्ही अमुक नोकऱ्‍या देणार असे वेळोवेळी सांगते. सरकारने अनेकदा आकड्यांची गणिते मांडली. मात्र, प्रत्यक्षात किती जॉब मिळाले हा तसा संशोधनाचा विषय! अजूनही काही खात्यातील नोकरभरती प्रक्रिया पूर्ण झाल्या नाहीत.

अशातच मध्यंतरी सरकारने खासगी नोकऱ्‍यांचा ‘जॉब फेअर’ कार्यक्रम राबविला. यावेळी सरकारने अमुक रोजगार उपलब्ध होणार असे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष आकडे वेगळेच होते! यातच आता खरी माहिती मिळविण्यासाठी काँग्रेसने आरटीआय मागविले आहे.

याविषयी काँग्रेसचे माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी आपण आरटीआय मागविली असल्याची माहिती दिली. त्यामुळे आरटीआयचे अस्त्र वापरून भिकेंनी आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात भिकेबाब किती यशस्वी होतात व सरकार किती उघडे पडते हे लवकरच कळेल.

हुश्श! अर्धे टेन्शन गेले..!

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी गोवा बोर्डाची पहिली सत्र परीक्षा दिली. शुक्रवारी दहावी व बारावी परिक्षेचे पहिले सत्र संपले. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीची पहिली सत्र परीक्षा सोपी होती म्हणून विद्यार्थी, पालक व शिक्षक खूष आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे अर्धे टेन्शन कमी झाले. पुढची परीक्षा वस्तुनिष्ठ असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाचे दहावी व बारावीचे विद्यार्थी थोडे जास्त नशीबवान ठरले आहेत. कारण पुढच्या वर्षी एकच परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांचे टेन्शन दोन सत्रात वाटणार नाही म्हणून विद्यार्थी खूष आहेत.

महिला काँग्रेसही गपगार

आठ काँग्रेस आमदार भाजपवासी झाल्यापासून गोव्यात तसे पाहिले, तर विरोधी बाजू लुळी पडली आहे. गोवा फॉरवर्ड, आप तसेच आरजीवाले आपल्यापरीने आवाज उठवीत असले, तरी ते स्वतंत्रपणे खिंड लढवीत असल्याने विरोधाला मर्यादा पडते.

पूर्वी महिला व युथ काँग्रेस सत्ताधाऱ्यांसाठी तापदायक ठरत होते, पण प्रथम प्रतिमाने महिला व नंतर संकल्पनी काँग्रेसला राम राम ठोकल्यापासून काँग्रेस रणांगणात दिसत नाही. विशेषतः महिला काँग्रेस आघाडीवर विशेष हालचाल दिसत नाही.

बिनाबायना चळवळ्या सहकारींची तर उणीव भासत नाही ना? की प्रदेश समितीकडून त्यांना आवश्यक तो पाठिंबा मिळत नाही?

बहुमताची ‘कोंडी’

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) निवडणुकीत अध्यक्षपदी विरोधी गटातील, सचिवपदी बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने बहुमत मिळालेल्या गटाची कोंडी झाली आहे. चौघांपैकी एक जण खजिनदारपदी असला, तरी अध्यक्ष व सचिव यांच्या हातात महत्त्वाची सूत्रे असल्यामुळे बहुमतातील गट हतबल झाल्याचे दिसून येते.

अध्यक्षाला नामोहरम करायचे आणि सचिवाला पकडीत ठेवायचे या हेतून बहुमत गटाने आता आरोपाचे सत्र सुरू केले असून काही सोशल मीडियावाल्यांना हाती धरून व्यवस्थित प्रसिद्धी मोहीम सुरू केली आहे.

या गडबडीत आपण मैदानावरील क्रिकेट आणि खेळाडूंच्या विकासासाठी संघटनेवर निवडून आलो आहोत याचा विसर या प्रसिद्धीबहाद्दरांना पडला आहे. एकालाही क्रिकेटच्या भल्याचे काहीच पडलेले नाही हे दिसून येते.

बॅग चोरीची चर्चा

इफ्फीसाठी बनविलेल्या मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांची ये-जा अधिक असते. मात्र, या मीडिया सेंटरमधून एका प्रतिनिधीच्या बॅग चोरीची चर्चा सध्या सेंटरमध्ये सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही बॅग चोरून नेण्याचे धाडस चोराने केले, याला काय म्हणायचे. मीडिया सेंटरच्या जवळच साहित्य ठेवण्यासाठीचा सुविधा कक्ष आहे.

त्याशिवाय मीडिया सेंटरमध्ये येणारे चेहरेही आता पत्र सूचना कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना ओळखीचे आहेत. कारण अनेक महोत्सव हीच मंडळी कव्हर करीत आली आहेत. तरीही अशा गर्दीतून बॅग गायब व्हावी, याचे मात्र अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे.

पत्रकार कक्षात नाही म्हटले तरी सात-आठ मंडळी असतात, त्यांच्याही नजरेस ही बाब आली नाही. अशा घटना घडल्यानंतर पत्र सूचना कार्यालयालाही दक्षता बाळगावी लागेल नाही का?

पाससाठी गर्दी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध ठिकाणांहून आलेल्या मीडिया प्रतिनिधींसाठी खास ‘डिनर पार्टी’ आयोजित करण्यात आली होती. त्याच्या पाससाठी आज पत्र सूचना कार्यालयाच्या काउंटरवर गर्दी झाली होती.

काहींना शेवटी हे पास मिळाले नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त केलीच. शिवाय ही ‘डिनर पार्टी’ दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये इफ्फी स्थळापासून दूरवर ठेवल्यानेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसचा चेहरा कोण?

म्हापसा विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. सध्या मतदारसंघात विरोधकाचा प्रमुख चेहरा कोण? यावरून अनेकांची वेगवेगळी मते आहेत, तर मोजकेच कार्यकर्ते सोडल्यास थेट मैदानात उतरून सत्ताधाऱ्‍यांविषयी आवाज उठविणारे क्वचितच नजरेस पडतात.

यातच काँग्रेसचे संजय बर्डे, विजय भिके, अ‍ॅड. शशांक नार्वेकर हे आपापल्यापरीने आवाज उठवितात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक सुधीर कांदोळकर हे हवे तसे विरोधकाच्या भूमिकेत दिसत नाहीत.

विशेष म्हणजे कांदोळकरांनी दोनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली खरी, परंतु त्यांना यश आले नाही. सध्या वरील त्रिकुट पत्रकार परिषदा घेऊन सरकारविरोधात बोलताना दिसतात. मात्र, सुधीरभाई तसे आक्रमक कधीच दिसले नाहीत.

अशावेळी काँग्रेसचा भविष्यात निवडणुकीचा चेहरा या त्रिकुटमधील असणार की अन्य कुणी दुसरा? यावरूनसुद्धा शहरात चर्चा रंगताना दिसते.

म्हापशात रवींद्र भवन बांधण्याचे पुन्हा आश्वासन..!

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापशात लवकरच रवींद्र भवन उभारणार असे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. त्यांचे वडील उपमुख्यमंत्री असतानापासून अशा घोषणा म्हापसेकर ऐकत आले आहेत, परंतु रवींद्र भवन उभारण्यासाठी प्रत्यक्षात कोणतीच पावले उचलली गेली नाहीत.

भाजपाच्या नेत्यांनीही त्यासंबंधी आश्वासने दिली, पण ती हवेतच विरली. म्हापसा हे उत्तर गोव्यातील मोठी बाजारपेठ असलेले महत्त्वाचे शहर. मोठ मोठे कलाकार इथे जन्मले, पण दुर्दैव म्हापशाचे की, इथे रवींद्र भवन उभारण्यात इथल्या प्रतिनिधीला की सरकारला स्वारस्य नाही अशीच चर्चा नेहमी ऐकू येते. आता म्हापसेकरांचे दैव कधी उजळते बघूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT