Goa Crime Cases: गोव्यात दहा दिवसांपूर्वी जयेश चोडणकर याचाही दोन टोळीयुद्धातील वैमनस्यातून खून झाला. हा खून चिंबल जंक्शन येथील पार्किंगवरून झाला असल्याचे भासवण्यात येत असले तरी जयेश व संशयितांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वितुष्ट निर्माण झाले होते. त्यातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जयेश चोडणकर याचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला तो पाहता हा खून क्रूरपणे करण्यात आला असल्याचे दिसून आले. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी एका पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांना अटक केली आहे.
चिंबल व मेरशी परिसरात गेल्या दहा दिवसांच्या मुदतीत घडलेल्या घटनांवरून लोकांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया सुरूच असतात, मात्र अनेकदा काहीजण या टोळ्यांच्या भीतीने कोणी पुढे येत नाहीत.
सांताक्रुझ येथील गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार जेनेटो कार्दोझ व चिंबल येथील इम्रान बेपारी या दोन टोळीमध्ये काही वर्षांपूर्वी गँगवॉर झाला होते. रात्रीच्या वेळी जेनेटो याच्या टोळीने बेपारीच्या घरावर हल्ला केला होता.
त्यावेळी दगडफेक तसेच गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात जेनेटो याच्या गटातील एक गुंड पिस्तुलाची गोळी लागून ठार झाला होता. इम्रान बेपारी याच्या ‘बूम बूम’ तर जेनेटो याच्या ‘बँग बँग’ टोळीत हे युद्ध झाले होते. त्यामुळे चिंबलचा परिसर हादरून गेला होता.
या प्रकरणी सनी डिसोझा व फ्रान्सिस हैदर यांना अटक झाली, पण टोळीचा म्होरक्या असलेला जेनेटो कार्दोझ हा मुख्य सूत्रधार होता. एका व्यक्तीला जमिनीच्या व्यवहारातून तो धमकावत होता. बेपारी त्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहिल्याने हे टोळीयुद्ध झाले होते.
हल्लीच दारूच्या नशेत असलेल्या तिघा संशयितांपैकी एका तरुणाने स्वतःजवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याने म्हापसा शहरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या संशयित जेम्स सोझा याला म्हापसा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.
तसेच त्याच्या इतर दोन साथीदारांनाही अटक केली आहे. जेम्स व त्याचे साथीदार हे पहाटे साडेचारच्या सुमारास पणजीहून म्हापशाच्या दिशेने येत असताना, बस्तोडा उड्डाणपुलावर त्यांनी फिर्यादी नवीन शेख (२६, डिचोली) यास अटकाव केला. त्यानंतर हे गुन्हेगार म्हापसा येथे सिंडिकेट बँकेनजीक रस्त्यावर पहाटे पावणेसहाच्या सुमारास दारू प्यायले. मद्यधुंद अवस्थेत जेम्सने हवेत गोळी झाडून दहशत माजवली. म्हापसा पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले होते.
नाईकवाडा-कळंगुट परिसरातील सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर, सूर्या कांबळी व इम्रान बेपारी यांच्यासह इतरांनी एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक असलेल्या स्वप्निल रेडकर याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्याला बेदम मारहाण केली होती. त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता.
हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला होता. या परिसरात टारझन पार्सेकर याने दहशत माजविली होती. तो सध्या कोलवाळ कारागृहात आहे. हल्लीच महिन्यापूर्वी कोलवाळ कारागृहात टारझन व कारबोटकर यांच्या गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांचे युद्ध कारागृहातही तेथील आपले वर्चस्व गाजवण्यावरून सुरू आहे हे स्पष्ट झाले. आतमध्ये राहून या टोळ्या बाहेर असलेल्या आपल्या सहाकाऱ्यांकडून गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवतात.
ताळगावात काही वर्षापूर्वी रायबंदर येथील एका गुन्हेगारी टोळीने रात्रीच्या वेळी गॅरेजमध्ये येऊन हल्ला चढवला होता. सराईत गुंड कृष्णा कुट्टीकर याच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला. रायबंदरपर्यंत हा पाठलाग केल्यानंतर पलायन करत असलेल्या टोळीला गाठले व पुन्हा तेथे गँगवॉर झाले.
या गँगवॉरमध्ये कृष्णा कुट्टीकर याच्यावर चॉपरने झालेल्या हल्ल्यात त्याचा हाताचा पंजा तुटून पडला होता. त्याच स्थितीत त्याला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. चिंबल व सांताक्रुझ परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या खंडणी वसुली करत आहेत.
ताळगावमध्येही २००० साली गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत्या. लोकांना धमकावून खंडणी वसुलीचे प्रकार होते. ताळगावचा गुंड साल्वादोर फर्नांडिस ऊर्फ घालू याने अनेक लोकांना धमकावून खंडणी वसुली केली होती. त्यामुळे त्याचे ताळगावातील इतर टोळ्यांबरोबर वैर निर्माण होऊन गँगवॉर सुरू झाले होते.
पूर्ववैमनस्यातून घालू याच्यावर हल्ला झाला होता. त्याने २००६ साली ताळगाव येथील इम्तियाझ शेख तसेच २००७ साली त्याचा भाऊ बाबनी शेख याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. हा हल्ला दोन टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून झाला होता.
कांदोळी येथील सौझा लोबो यांच्या रेस्टॉरंटवर व्यावसायिकेतून दोन गटांमध्ये हल्ला झाला होता. गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याने काही बाऊन्सरना घेऊन हा हल्ला केला होता. यावेळी तेथे पिस्तुलाने गोळीही झाडण्यात आली होती. या घटनेवेळी रेस्टॉरंटमधील दोन कर्मचारी जखमी झाले होते.
पोलिसांनी सुमारे २० हून अधिक जणांना अटक केली होती. या हल्ल्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना अटक झाली होती. पोलिसांकडून या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवणे दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याने या टोळ्यांचे आयतेच फावले आहे.
सांताक्रुझ, चिंबल व मेरशी या तीन परिसरात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. पोलिसांनी जरी या टोळ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी हप्तेवसुली सुरूच आहे. संरक्षण रक्कम (प्रोटेक्शन मनी) म्हणून परप्रांतियांना धमकावून वसूल करण्यात येत आहे.
रस्त्याच्या बाजूने शहाळ्यांचे तसेच फळविक्रेत्या गाडेधारकांकडून हे गुन्हेगार हप्ता घेतात. पंचायतीचे सदस्यही त्यांच्याशी वैर घेण्यास तयार नसतात. या गुन्हेगारांकडून कधी व केव्हा हल्ला होईल याचा नेम नसल्याने कोणीही त्यांच्याशी पंगा घेत नाही. त्यामुळे या गुन्हेगारांचे आयतेच फावते.
बेती येथील अश्पाक बेंग्रे याने राज्यात गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यानंतर त्याचा कारागृहात कारबोटकरने गेम केला होता. बाहेर गँगवॉरबरोबर तर कारागृहात आरोपींच्या टोळ्यांमध्ये गँगवार घडायचे. त्यातूनच अश्पाक बेंग्रे याच्यावर चॉपर व चाकू तसेच लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करून कारबोटकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र काही महिन्यांनी कारबोटकर याने कारागृहात दहशत निर्माण केल्यानंतर कारागृहातील काही कैद्यांनीच त्याचा काटा काढला. त्यामुळे या दोन्ही सराईत गुन्हेगारांचा कारागृहातच मृत्यू झाला होता.
राज्यात सराईत गुन्हेगार म्हणून विजय कारबोटकर हा मूळ बिठ्ठोण येथील असून त्याने हळदोणेचे माजी सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. कारबोटकर याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पर्वरी पोलिसांनी दाखल केला होता. त्याला अटक होऊन सध्या तो कोलवाळ कारागृहात आहे.
नाईक हे रात्रीच्या वेळी हळदोणा येथील रेस्टॉरंटमध्ये बसले असताना कारबोटकर याच्या टोळीने त्यांच्यावर चॉपर व चाकूने वार केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचारावेळी अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या.
कांदोळी, कळंगुट व हणजूण या परिसरात सुरू असलेल्या ड्रग्जचा व्यवसायात काही नायजेरियन आहेत. त्यांच्याही टोळ्या या किनारपट्टी भागात सक्रिय झाल्या आहेत. त्यांचे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांशी खटके उडत असल्याने अनेकदा त्यांच्यामध्येही हल्ल्याचे प्रकार घडतात.
दहा वर्षांपूर्वी पर्रा-बार्देश येथे एका नायजेरियन नागरिकाचा गुन्हेगारी टोळीने ड्रग्जप्रकणातून मारहाण व त्यानंतर खून केला होता. या टोळीने दुचाकीवरून नायजेरियनचा पाठलाग केला होता व बेदम मारहाण केली होती. त्यानंतर नायजेरियन नागरिकांनी पर्वरी येथील महामार्गावर हैदोस घातला होता.
गुन्हेगारीमध्ये सर्रास नाव असलेला हणजूण-शापोरा येथील ओमकार पालयेकर हा ड्रग्ज डिलर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने २०१३ मध्ये नायजेरियनचा खून केल्याबद्दल गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच धमक्या व खंडणी वसुलीचे अनेक गुन्हे पोलिसांत दाखल आहेत.
ड्रग्जव्यवसायातील टोळ्यांमध्ये त्याचाही सहभाग आहे. या व्यवसायामधून त्याने अनेकांवर हल्लेही केले आहेत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याने हणजूण पोलिसांत हिस्ट्रीशिटर म्हणून नोंद करण्यत आलेली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.