Inside Goa Gangwar : कोब्राने उचलला विशालचा काटा काढण्‍याचा विडा

Goa Crime Cases: गोव्यातील मेरशी, चिंबल, सांताक्रुझ या परिसरात गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे.
Inside Goa Gangwar | Vishal Golatkar Murder Case
Inside Goa Gangwar | Vishal Golatkar Murder Case Dainik Gomantak
Published on
Updated on

विलास महाडिक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्‍हा गँगवॉरने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. उत्तर गोव्यातील मेरशी, चिंबल, सांताक्रुझ या परिसरात गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे. खंडणी वसुली तसेच सुपारी घेऊन एखाद्याला मारहाण तसेच खून करण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

दिवसाढवळ्या गँगवार होऊन मुडदे पडू लागल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे. पोलिस यंत्रणा गँगवॉरला आळा घालण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अनेक लहान-मोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण होत आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या याद्या तयार केल्या असल्या तरी त्‍यांचे त्यांच्यावर नियंत्रण राहिलेले नाही. विशेष म्‍हणजे या गँगवॉरमध्ये पोलिस कर्मचारीही गुंतल्‍याचे उघड होत आहे.

Inside Goa Gangwar | Vishal Golatkar Murder Case
Goa Assembly Monsoon Session: टोमॅटो दरवाढ विधानसभेत! सरदेसाई म्हणाले मोफत वाटा, नाईक म्हणतात झळ नाही

मेरशी-चिंबल येथे प्राणघातक हल्ला करून जयेश चोडणकर याचा खून करण्‍यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच मेरशीत दहा दिवसांच्या आत दुसरा खून झाला. हे दोन्ही खून टोन टोळ्यांमध्‍ये असलेले पूर्ववैमनस्य तसेच अंतर्गत वितुष्टामुळे झालेले आहेत.

गुन्हेगारांच्या कारवायांबाबत पोलिस गुप्तचर यंत्रणा माहिती मिळवण्यात अयशस्वी ठरत आहे. काही पोलिसांना या गुन्हेगारांच्या कारवाया तसेच त्यांच्‍यात असलेल्या वितुष्टाची माहिती असूनही ती लपविली जात असल्याने गँगवॉरचे प्रकार घडत आहेत.

कोब्राने उचलला विशालचा काटा काढण्‍याचा विडा

मेरशी येथे १५ जुलै रोजी शनिवारच्‍या मध्यरात्री सराईत गुन्हेगार व पोलिस स्थानकात अनेक गुन्हे नोंद असलेला विशाल गोलतकर या गुंडाचा नियोजितपणे काटा काढण्यात आला. त्‍याने चिंबल व मेरशी परिसरात आपली दहशत निर्माण केली होती.

या परिसरातील इतर गुन्हेगारांवर तो वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याने तसेच खंडणी वसुलीमध्ये इतरांना अडचणी निर्माण करत असल्याने विरोधी टोळ्या त्याच्यावर डुख धरून होत्या. विशाल आपल्या टोळीतील सहकाऱ्यांना शिवीगाळ तसेच मारहाणही करत असे. त्‍यामुळेच त्याचा उजवा हात समजला जाणारा साई ऊर्फ कोब्रा कुंडईकर याला अनेकदा अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले होते.

इतर सहकाऱ्यांच्या समोरच तो टोळीतील एखाद्याचा पाणउतारा करायचा. मेरशी व चिंबल परिसरातील लोकही त्याच्या धमक्यांना कंटाळले होते. त्यातूनच अखेर टोळीतील सहकाऱ्यांनीच विशालला संपविण्याचा विडा उचलला.

बेरोजगार युवकांची बनविली टोळी

विशाल गोलतकर याने अनेकांना मारहाण करून धमक्या दिल्‍या होत्‍या. खंडणी वसुलीच्‍या कामासाठी त्‍याने टोळी तयार केली होती. त्‍यासाठी काही बेरोजगार तरुणांना त्‍याने आपल्या जाळ्यात अडकवले होते. त्याने ही टोळी कालांतराने अधिक सक्रिय करताना इतरांना कामाला लावून स्वतः त्यावरील मलई खात होता.

कोब्रा हा गेल्या काही दिवसांपासून विशालने त्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्‍याच्‍यापासून दूर झाला होता. त्यामुळे विशालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. परिणामी कोब्राने आपला भाऊ तुषार कुंडईकर याच्या मदतीने विशालचा गेम करण्याचा कट रचला.

बेसावध विशालवर तीक्ष्‍ण हत्‍यारांनी हल्ला

विशाल हा मेरशी येथील निखिल बार अँड रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या वेळी बसला असल्याची माहिती मिळाल्यावर कोब्राने त्याला धमक्या देण्याबरोबरच ‘हिंमत असेल तर भेटायला ये’ असे सुनावले. संतप्त बनलेल्या विशालने त्‍याचे आव्हान स्वीकारले व तो बुलेटवरून निघाला.

यावेळी तयारीत असलेल्या कोब्रा व त्याच्या साथीदारांनी विशालला कोणतीच संधी न देता त्‍याच्‍यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. त्यानंतर तीक्ष्ण हत्‍याराने त्याच्यावर हातापायावर तसेच छातीवर वार करण्यात आले. तसेच डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्यावर तो गतप्राण झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

पोलिसांचा गँगवारमधील सहभाग चिंताजनक

विशालचा काटा काढण्यासाठी कोब्राने प्‍लॅन आखला होता. त्याने त्‍याबाबत भाऊ तुषार कुंडईकरला माहिती दिली होती. विशाल नेहमी हत्यार वा पिस्तूल घेऊनच फिरायचा. रात्री उशिरापर्यंत बारमध्‍ये बसून तो दारू ढोसायचा. दारू पिण्‍यावर त्याचे नियंत्रण नव्‍हते. त्यामुळे तो दारूच्‍या नशेत असताना संधी साधण्‍याची योजना कोब्राने आखली. कोब्राने त्‍याला ठार मारण्‍याची धमकी दिली.

त्‍यामुळे पिसाळलेला विशालने कोणताही विचार न करता त्याच्यावर चाल केली. आपली बुलेट घेऊन तो कोब्राने बोलवलेल्या ठिकाणी गेला. तेथे दोघांचे जोराचे भांडण झाले. यावेळी झाडीत लपून बसलेल्या साईच्या साथीदारांनी बेसावध असलेल्या विशालवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.

Inside Goa Gangwar | Vishal Golatkar Murder Case
Panjim News : नार्वे फेरी धक्क्याची दुरुस्ती रखडली

अपमानाचा सूड घेतल्याची कबुली

जुने गोवे पोलिसांनी विशाल गोलतकर याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरोधी टोळ्यांचा शोध घेऊन तपास सुरू केला. त्यातून माहिती पुढे आली की काही दिवसांपासून विशाल व कोब्रा यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते.

पोलिसांनी कोब्राला काल संध्याकाळी लगेच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आपण आपल्‍या अपमानाचा सूड घेतल्याची कबुली त्‍याने पोलिसांना दिली. खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेण्यास वेळ लागला नाही.

रात्री दहा वाजेपर्यंत इतर चौघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. त्यातील एकटा वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर तेथील अधिकाऱ्यांना नजर ठेवण्यास सांगितले होते.

मेरशी परिसरात विशालचे अनेक शत्रू

गेल्या काही वर्षापासून विशाल गोलतकर याची मेरशी व चिंबल या परिसरात दहशत होती. त्याने या परिसरातील बेरोजगार तसेच टारगट युवकांना हाताशी धरून आपली टोळी उभी केली होती. सराईत गुन्हेगार विशाल याच्याविरोधात जुने गोवे पोलिस स्थानकात सहा तर पणजी आणि पर्वरी पोलिस स्थानकात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद होती.

यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, तसेच शस्त्र बाळगणे, धमकी देणे, मारहाण, खंडणी व दरोडा अशा प्रकरणांचा समावेश होता. या गुन्ह्यांमधून तो जामिनावर सुटला होता. जामिनावर बाहेर आल्यावर त्याच्या कारवाया पुन्हा सुरू व्हायच्या. कारागृहात असतानाही तो आपल्या टोळीतील सहकाऱ्यांच्‍या संपर्कात राहून धमक्या व खंडणी वसुलीचे प्रकार त्यांच्याकडून करवून घेत होता.

बारमध्‍ये दारू प्‍यायचा, पण पैसे नाही द्यायचा

विशाल गोलतकर याचे आपल्‍या नातेवाईकांशीही संबंध चांगले नव्‍हते. लोकांनाही तो नकोसा झाला होता. त्यामुळे काल त्याच्या खुनाची बातमी मेरशी परिसरात समाजताच स्थानिकांना काहीच नवल वाटले नाही. काहींनी तर ‘झाले ते बरे झाले, निदान या भागातील दहशत तरी कमी होईल’ अशा प्रतिक्रिया व्‍यक्त केल्‍या.

ज्या निखिल बार अँड रेस्टॉरंटमध्ये विशाल रात्री उशिरापर्यंत दारू पिण्यास बसला होता, तो कोब्राच्याच नातेवाईकांचा होता. विशाल दारू पिण्यास काही मद्यालयांत जायचा, मात्र त्याच्याकडे पैसे मागण्याचे धाडस कोणी करत नसे. त्याच्या या दहशतीला व्यावसायिकही कंटाळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com