पणजी: गोव्यात नुकताच राज्य स्थापना दिन उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी सोशल मीडियावरुन राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, गोवा काँग्रेसने देखील राज्य स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र कार्यक्रमात काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका बॅनरमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा फोटो नसल्याने नवा वाद निर्माण झाला. भाजपने यावरुन काँग्रेसवर शरसंधान साधले. काँग्रेसने दलित नेतृत्वाचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
दरम्यान, 30 मे रोजी राज्य स्थापना दिनाच्या दिवशी गोवा प्रदेश काँग्रेसने (Congress) राजधानी पणजी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बॅनरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे फोटो होते, मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांचा फोटो गायब होता. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दक्षिण गोव्यातील नावेली येथे खर्गे यांची उपस्थिती असणारी एक जाहीर सभा देखील अचानक रद्द करण्यात आली.
दुसरीकडे, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना गोवा (Goa) भाजपने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर संबंधित बॅनरचा फोटो पोस्ट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने दलित अध्यक्षाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. काँग्रेसच्या अधिकृत बॅनरमधून त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा फोटो जाणूनबुजून वगळण्यात आला. हा पक्षाच्या अंतर्गत असलेल्या दलितविरोधी वृत्तीचा स्पष्ट पुरावा आहे, असे भाजपने म्हटले.
भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेनंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना हा प्रकार चुकून घडल्याचा दावा केला. खर्गे यांचा फोटो केवळ एका बॅनरवरुन चुकून वगळला गेला. शहरात लावलेले इतर सर्व पोस्टर्स तपासल्यास त्यांचाच फोटो दिसेल. हा एक किरकोळ विषय असून भाजपने त्यावरुन अनावश्यक वाद निर्माण केला, असे पाटकर म्हणाले.
"आम्ही भाजपच्या भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहोत. भाजपच्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांना आम्ही बळी पडणार नाही," असेही पाटकर पुढे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.