Indian Coast Guard Goa: गोवा येथील 'आयएफबी संत अँटोन-१' (IFB St. Anton-1) या मासेमारी बोटीतील ३१ मच्छिमारांचा ११ दिवसांच्या भीषण संघर्षानंतर अखेर भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard - ICG) सुरक्षित वाचव केला आहे. बोटीच्या स्टिअरिंग गियरमध्ये बिघाड झाल्यामुळे न्यू मंगळूरपासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर बोटीचा संपर्क तुटला होता आणि ती अरबी समुद्रात अडकली होती.
संपर्क तुटल्याची माहिती मिळताच, तटरक्षक दलाच्या कर्नाटक मुख्यालयाने तत्काळ आणि निर्णायक कारवाई केली. रविवारी (दि. २६) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आयसीजीचे गस्ती जहाज 'कस्तुरबा गांधी' या बोटीच्या शेवटच्या संपर्क तुटलेल्या भागात पाठवण्यात आले, तर कोची कोस्टल फोर्सचे 'डोर्नियर विमान' हवाई शोधासाठी तैनात करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात असलेल्या अशांत हवामानामुळे ही बोट काही अंतरावर भरकटली होती. तटरक्षक दलाने 'रिअल-टाइम हवामान डेटा' आणि 'इंटिग्रेटेड ऑपरेशन्स सेंटर' मधील डेटा वापरून जहाजाचे संभाव्य स्थान अचूकपणे शोधून काढले. या अचूक गणना आणि समन्वयामुळेच मच्छिमारांना वेळेवर शोधण्यात आणि वाचवण्यात यश आले.
या यशस्वी बचाव मोहिमेनंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतीय तटरक्षक दलाचे विशेष कौतुक केले. त्यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले:
"भारतीय तटरक्षक दलाच्या त्वरित कारवाईमुळे गोव्यातील ३१ मच्छिमारांना आव्हानात्मक हवामानातही वाचवण्यात यश आले आहे. त्यांचे धैर्य, समन्वय आणि व्यावसायिक कौशल्य केवळ आपल्या किनारपट्टीचीच नव्हे, तर समुद्रावर अवलंबून असलेल्या उपजीविकेचीही सुरक्षा करते." तटरक्षक दलाच्या या कार्यामुळे ११ दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या ३१ मच्छिमारांना अखेर सुरक्षितपणे आपल्या घरी परतता आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.