

IND vs AUS Head To Head T20I Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका नुकतीच संपली. आता या दोन बलाढ्य संघांमध्ये पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे, ज्यातील पहिला सामना उद्या, 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांकडे टी20 क्रिकेटमधील अनेक 'महारथी' खेळाडू आहेत, जे काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र बदलू शकतात. चला तर मग मालिकेचा थरार सुरु होण्यापूर्वी टी20 मधील दोन्ही संघांचा आजवरचा रेकॉर्ड कसा आहे, यावर एक नजर टाकूया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीनुसार, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले आहे.
भारताचा (India) विजय: 20 सामने
ऑस्ट्रेलियाचा विजय: 11 सामने
अनिर्णित: 1 सामना
या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाने 24 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघ 181 धावांपर्यंतच मजल मारु शकला होता. भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माची दमदार खेळी निर्णायक ठरली होती. त्याने 41 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 92 धावांची तुफानी खेळी खेळली होती. त्याच्या या आतिशी खेळाच्या जोरावरच भारताने विजय संपादित केला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2007 मध्ये खेळला गेला होता. या पहिल्या सामन्यातही भारतानेच 15 धावांनी विजय मिळवला होता. भारताच्या विजयात युवराज सिंहने मोलाची भूमिका निभावली होती. त्याने 30 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने एकूण 70 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
याशिवाय, महेंद्र सिंह धोनीने 36 धावांचे योगदान दिले होते. उत्कृष्ट कामगिरीमुळे युवराज सिंहला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या आगामी मालिकेत भारत आपला रेकॉर्ड अधिक मजबूत करतो की ऑस्ट्रेलिया जोरदार टक्कर देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.