Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : एव्हरेस्टच्या शिखरावर पहिला गोमंतकीय; पंकज नार्वेकरचे साहस

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारा पंकज नार्वेकर पहिला गोमंतकीय गिर्यारोहक ठरला. त्याने २१ मे रोजी ही ऐतिहासिक कामगिरी केली.

पंकज ४१ वर्षीय असून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात साहाय्यक अभियंतापदी कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार, माऊंट एव्हरेस्ट यापूर्वी एकाही गोमंतकीय गिर्यारोहकाने सर केले नव्हते. पंकजने अथक मेहनत आणि दृढनिश्चयाच्या बळावर पृथ्वीवरील सर्वांत उंच शिखरावरून ‘आय लव्ह गोवा’ हा संदेश दिला. नेपाळी भाषेत ‘सागरमाथा’ या नावाने ओळखले जाणारे माऊंट एव्हरेस्ट ८,८४८.८६ मीटर उंचीवर आहे. १९५३ साली एडमंड हिलरी व तेनझिंग नॉर्गे यांनी सर्वप्रथम जगातील सर्वांत उंच ठिकाणी पाऊल टाकण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.

पंकजची यापूर्वीही यशस्वी मोहीम

एव्हरेस्टचे शिखर पादाक्रांत करण्यापूर्वी पंकज नार्वेकरने यापूर्वीही गिर्यारोहणात धाडसी मोहिमा पार पाडलेल्या आहेत. २०१५ पासून त्याला गिरीशिखरे साद घालत आहेत. माऊंट कामेत (७७५० मीटर उंच), माऊंट कुन (७०७७ मीटर उंच), माऊंट कांग यात्से १ व २ (६४०० मीटर व ६२५० मीटर उंच) पंकजने यापूर्वी सर केले आहेत.

बक्षीसप्राप्त पराक्रम ः युरी आलेमाव

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पंकज नार्वेकरचे अभिनंदन केले असून भविष्‍यातील साहस मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘गोवा सरकारने पंकजच्या साहसाची दखल घेणे गरजेचे आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आवाहन करतो, की त्यांनी त्यांच्या महान कामगिरीची दखल घ्यावी आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सरकारकडून बक्षीस द्यावे,’’ असे युरी म्हणाले.

पंकज नार्वेकर माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला गोमंतकीय ठरल्याने गोव्यासाठी अभिमानाचा क्षण! पंकजचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. ही कामगिरी राज्यातील तरुण गिर्यारोहकांना प्रेरणा देईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्यं

मुलगी गुंजनही पराक्रमी

पंजकची १३ वर्षीय मुलगी गुंजन नार्वेकर हीसुद्धा गिर्यारोहक असून गतवर्षी बाप-लेकीने नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कँप गाठण्याचा पराक्रम साधला होता. या कँपवर जाणारी सर्वांत युवा गोमंतकीय हा मान गुंजनला मिळाला होता. गतवर्षी गुंजनने लडाख क्षेत्रातील मरखा खोऱ्यातील तीन शिखरे ६२.५ तासांत सर करण्याचा अनोखा विश्वविक्रम साधला होता.

गुंजनने कांग यात्से-२ (६२५० मीटर), माऊंट रेपोनी मल्लारी-१ (६०९७ मीटर) व माऊंट रेपोनी मल्लारी-२ (६११३ मीटर) या पर्वतांची शिखरे पादाक्रांत केली. तिने विश्वविक्रम साधताना ६००० मीटरहून जास्त उंचीचे पर्वत ४९ तासांत (पहिले ते तिसरे शिखर), तर ६२.५ तासांत (बेसकँप ते बेसकँप) चढण्याचा विक्रम नोंदला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT