

दुबई: सध्या संपूर्ण भारतात रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानसह काही इस्लामिक देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. हा चित्रपट पाकिस्तानची प्रतिमा मलीन करणारा असल्याचा दावा या देशांनी केला आहे. पण म्हणतात ना, कलेला सीमा नसतात; याचाच प्रत्यय नुकताच दुबईत पाहायला मिळाला. ज्या 'धुरंधर' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी आहे, त्याच चित्रपटातील गाण्यावर चक्क पाकिस्तानच्या युवा क्रिकेट खेळाडूंनी ठेका धरला.
भारताला हरवल्यानंतर 'धुरंधर' स्टाईल जल्लोष
रविवार, २१ डिसेंबर रोजी दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये अंडर-१९ आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना पार पडला. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा १९१ धावांनी पराभव करत जेतेपदावर नाव कोरले.
अंडर-१९ आशिया चषकाच्या इतिहासात पाकिस्तानचा हा अंतिम फेरीतील पहिलाच विजय होता. या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, या आनंदाच्या भरात ते आपल्याच देशाने घातलेली बंदी विसरले आणि 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यावर जल्लोष साजरा करू लागले.
एशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विजयानंतर पाकिस्तानी खेळाडू मैदानात डान्स करताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्हिडिओमध्ये अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील एंट्रीसाठी वापरलेले ‘फस्ला’ (FA9LA) हे लोकप्रिय गाणे वाजत आहे.
बहरीनचा रॅपर 'फ्लिपराची' याने गायलेले हे गाणे सध्या जागतिक स्तरावर ट्रेंड होत आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी या गाण्यातील 'बलोच डान्स' स्टेप्सची हुबेहूब नक्कल करत विजयाचा आनंद साजरा केला. आता सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत की, ज्या सिनेमाला देशात विरोध आहे, त्याचेच गाणे विजयासाठी कसे चालते?
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना समीर मिन्हासच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ३४७ धावांचा डोंगर उभा केला होता. मिन्हासने केवळ ११९ चेंडूत १७२ धावांची खेळी केली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ अवघ्या १५६ धावांत गारद झाला. पाकिस्तानने हा सामना १९१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून आशिया चषकावर आपले नाव कोरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.