मडगाव: गोव्यातील बंगले आणि व्हिला भाड्याने घेऊन त्यातून बनावट कॉल सेंटर चालविण्याच्या चार घटना या एप्रिल महिन्यातच उघडकीस आल्या आहेत. झटपट लोन देणे, गुंतवणूक दुप्पट करणे आणि नामांकित कंपन्यांकडून बक्षीस लागल्याची बतावणी करून या कॉल सेंटरमधून आतापर्यंत लाखो विदेशी लोकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायबर मायाजालातून सुरू असलेल्या या बनावटगिरीचा मुख्यत: अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि कॅनेडियन नागरिकांना फसवल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या सर्वांमागे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असावे, असाही संशय व्यक्त केला जात आहे.
काल क्राईम ब्रँचने सांतीनेज येथील एका आलिशान इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून ९ जणांना अटक केली; तर दोनापावल येथे एका व्हिलामध्ये सुरू असलेले बनावट कॉल सेंटर रॅकेट उघड करताना दहा जणांना अटक केली असून, या दोन्ही प्रकरणांत फसवणुकीसाठी वापरले गेलेली इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि वाहने असा एकूण ९४.७० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या तपासाशी संबंध असलेल्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ही दोन्ही कॉल सेंटर्स रात्रीच्यावेळी सुरू असायची आणि या सेंटरमध्ये काम करणाऱ्या लोकांना ग्राहकांशी कसा संपर्क साधून त्यांना आपल्या गळाला लावायचे, याबद्दल पूर्णत: प्रशिक्षित केले गेले होते.
या सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ॲक्सेंटमध्ये (लहेजा) मधाळ कसे बोलावे, याचेही प्रशिक्षण दिले होते. यातील काहीजण उच्च शिक्षित असून फक्त आकर्षक वेतन प्राप्त होते याच आमिषातून ते या कॉल सेंटरकडे वळले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील नागरिकांकडे संपर्क साधण्याचे त्यांना काम दिले असल्याने या दोन्ही देशांतील वेळ साधण्यासाठी ही सेंटर्स पूर्ण रात्रभर सुरू असायची, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
या कॉल सेंटरमधून अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया याच देशातील नागरिकांना लक्ष्य करण्याचे कारण म्हणजे, या तिन्ही देशातील लोकांची क्रयक्षमता हे मुख्य कारण असून भारतातून सुरू असलेल्या अशा बनावटगिरीचा या देशातील लोकांना फारशी माहिती नसल्याने त्याचाच फायदा हे स्कॅमस्टर्स उठवितात.
यासाठी ते विदेशी नागरिकांचा डाटाबेज विकत घेतात किंवा हा डाटाबेस हॅक करून त्यांना फसवितात. कित्येकवेळा ऑनलाईन ऑफर्स देण्याच्या बहाण्याने या कॉलसेंटरमधून लोकांना भुलविले जाते.
झटपट लोन मिळवून देतो, गुंतवणूक वाढवून देतो अशा स्वरुपाची आमिषे दाखवून लोकांना गंडविले जाते. गोव्यात जे दोन प्रकार उघडकीस आले आहेत, त्यात लोन देण्याच्या बहाण्याने विदेशी लोकांना लुटले गेले. ग्राहक आपल्या कब्जात आल्याचे दिसून आल्यावर त्यांच्याकडून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली पैसे घेतले जातात आणि हे पैसे खात्यात आल्यानंतर त्या ग्राहकाकडील संपर्क तोडला जातो.
१ ही बनावट कॉल सेंटर्स म्हणजे एक सुसज्ज असे कार्यालय स्वरूपात थाटले जाते. जसे बीपीओ केंद्र चालविले जाते तसेच हे सेंटर चालविले जाते.
२अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी त्या देशातील प्रचलित वेळेप्रमाणे गोव्यात रात्री ही सेंटर्स सुरू असतात.
३ या सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी प्रशिक्षित केले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेटस् ठरवून दिलेले असते आणि या टार्गेटप्रमाणे त्यांना पैसे दिले जातात.
एकदा ग्राहक आपल्या जाळ्यात सापडला हे लक्षात आल्यावर या ग्राहकांना ॲपल किंवा वॉलमॅटच्या गीफ्टकार्डद्वारे पैसे पाठविण्याचे आवाहन केले जाते. कित्येकवेळा ऑनलाईन माध्यमातून तर काहीवेळा क्रिप्टोकरन्सी माध्यमातून हे व्यवहार होतात. ग्राहकांकडून आलेले पैसे बनावट नावे उघडलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. ही खाती असंख्यपटीने उघडलेली असतात. या खात्यात आलेले पैसे नंतर दुसरीकडे वळविले जातात. तपास यंत्रणांच्या दाव्याप्रमाणे, एका मास्टरमाईंडद्वारे हे सर्व रॅकेट चालविले जाते. त्याच्याकडून वेगवेगळीकडे अशी कॉल सेंटर्स उघडली जातात. त्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी तसेच या कॉल सेंटरच्या तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाते.
अशी बनावट कॉल सेंटर्स उघडण्यासाठी गोवाचा एक महत्वाचे केंद्र म्हणून वापर केले जाते. या मागचे मुख्य कारण म्हणजे, गोवा हे पर्यटन केंद्र असून गोव्यात फ्लॅटस् आणि व्हिला भाड्याने सहज मिळू शकतात.
गोवा हे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात तसेच केरळ व तेलंगणा या राज्यांसाठी जवळचे राज्य असून या पाचही राज्यात इंग्रजी बोलणारे चांगले कर्मचारी मिळत असल्याने ते गोव्यात या कामासाठी सहजपणे येऊ शकतात.
यापूर्वीही गोव्यातून अशी कॉलसेंटर्स सुरू होती. त्यामुळे गोव्यात असे व्यवहार करण्यासाठी जी माणसे लागतात ती सहजपणे उपलब्ध होऊ शकतात यासाठी गोवा राज्याला असले व्यावसायिक जास्त पसंती देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.