Illegal cables on Poles Fine To Jio Digital Blitz Global
पणजी: इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी वीज खांबांचा गैरवापर केल्याप्रकरणी वीज खात्याने जिओ डिजिटलला ३.४ कोटी तर ब्लीट्झ ग्लोबलला १.८० कोटींचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या एजन्सींना वीज खांबावरून १५ दिवसांत केबल न हटविल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तंबी वीज खात्याने दिली आहे.
वीज खात्याचा कार्यकारी अभियंतापदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काशिनाथ शेट्ये यांनी खांबावरील केबल हटविण्याचे काम हाती घेतले.
केबल ऑपरेटर्स व इंटरनेट सेवा देणाऱ्या संस्था बिनदिक्कतपणे वीज खात्याच्या खांबांचा वापर करीत होते. वीज खात्याकडून कोणतीही रीतसर परवानगी न घेता मोफत खांबांचा वापर होत होता. शेट्ये यांनी केबल हटविण्याचे आदेश देताच इंटरनेट सेवा व केबल टीव्ही सेवेचा बोजवारा उडाला होता. त्यानंतर केबल ऑपरेटर्सनी वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत बैठक घेतली होती. परंतु त्यांना काही दिलासा मिळाला नाही.
मंत्र्यांकडून दिलासा मिळाला नाही म्हणून केबल ऑपरेटर्सनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. न्यायालयाकडून वीज खात्याला दिलासा मिळताच वीज खात्याने कारवाईचा बडगा उगारला. आता वीज खात्याकडून केबल हटविण्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
सेवेवर होणारा परिणाम लक्षात घेता वीज खांबांचा वापर करण्यासाठी काही ऑपरेटर्सनी वीज खात्याकडे परवानगी मागितली आहे, तर अजून काहीजणांनी अर्जही केलेला नाही. त्यामुळे वीज खात्याने ऑपरेटर्सकडून सेवा देणाऱ्या ऑपरेटर्सच्या नावांची यादी मागविली आहे. केबलमुळे घडणारे अपघात किंवा जखमींची जबाबदारी घ्यावी, असे शेट्ये यांचे म्हणणे आहे.
वीज खांबांवरील केबल्स ठरावीक मुदतीनंतर हटविल्या नाहीतर तर त्या हटविण्याची जबाबदारी साहाय्यक अभियंता (एई) आणि कनिष्ठ अभियंत्यांची (जेई) आहे. कामात कुचराई केली तर दररोज त्यांच्या वेतनातून ३०० रुपये कपात केले जातील, असा इशारा काशिनाथ शेट्ये यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.