पणजी: भाजपने विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) रणनीती ठरवण्यासाठी आता प्रत्यक्ष हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे (BJP) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि निवडणूक सहप्रभारी दर्शना जरदोश 20 रोजी गोव्यात येणार आहेत. पक्षाची गाभा समिती व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी निवडणूक रणनीतीविषयी चर्चा करण्यात येणार आहे. प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस प्रथमच गोव्यात येत आहेत.
जरदोश व फडणवीस यांच्याशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनुक्रमे गांधीनगर व मुंबई येथे चर्चा केल्यानंतर हा दौरा निश्चित झाला आहे. भाजप मगोशी युती करणार याकडे भाजपमधील व मगोमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांचे डोळे लागून राहिले आहेत. निवडणुकीची जबाबदारी भाजपने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असती तर युती झाली असती, असे मानले जात आहे. मध्यंतरी मगोचे नेते, आमदार सुदिन ढवळीकर हे नागपूरला जाऊन त्यांनी गडकरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चेला अधिक बळकटी प्राप्त झाली होती.
‘सोशल’ यंत्रणाही तयारीत
भाजपने सध्या विविध मतदारसंघांच्या बैठका घेतल्या आहेत. विविध मोर्चांची मतदान केंद्र पातळीवरील समितीपर्यंत बांधणी केली आहे. माहितीच्या प्रसार, प्रचारासाठीही मतदान केंद्र पातळीवर दोन कार्यकर्ते तयार केले आहेत. समाज माध्यमे कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. यामुळे फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर भाजप प्रत्यक्ष कृती करण्याच्या दिशेने आणखीन पावले टाकेल, असे दिसते.
काँग्रेस : उमेदवारीसाठी गर्दी
कॉंग्रेसने निवडणूक निरीक्षकपदी पी. चिदंबरम साऱ्या गांधी घराण्याशी एकनिष्ठ व जवळच्या असलेल्या नेत्याची नियुक्ती करून निवडणूक तयारीत आघाडी घेतली आहे. सध्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी लहान मोठ्या नेत्या कार्यकर्त्यांची रांग लागलेली आहे. त्यात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर 2012 पासून सलग सरकार असल्याने जनतेत साहजिकपणे निर्माण झालेला विरोध (ॲन्टी इन्कंबन्सी) याला भाजप कसे तोंड देणार हे 20 नंतर स्पष्ट होणार आहे.
प्रभारीपदी नियुक्तीनंतर फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लक्ष
भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांची आपल्या गोवा दौऱ्यात झाडाझडती घेतली होती. तेही पुन्हा गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेत्यांचे पक्ष संघटनेसाठीचे योगदान यावर त्यांचा भर आहे. मतदान केंद्रनिहाय समित्या, मतदार यादी पान प्रमुखांचे कर्तव्य यावर ते जास्त लक्ष देतात. कोणकोणत्या मतदारसंघात किती पाण्यात आहेत हे ते अचूकपणे जोखतात.त्यामुळे याखेपेला विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारीसाठी शिकस्त करावी लागणार असे दिसते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.