Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: राजकीय पक्षांची तोंडाची बॅटिंग सुरु...

गोवा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले

विठ्ठल पारवाडकर

पणजी: गोवा विधानसभेच्या निवडणुकांची (Goa Assembly Election 2022) तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे राज्यातील राजकीय वातावरण तप्त होत आहे. राजकीय पक्षांची गर्दी कधी नव्हे ती वाढलेली असून नव्याने राज्यात आलेले तसेच गोव्यात अनेक वर्षे असुनही काहीच प्रभाव न टाकलेले विविध हवसे, गवसे तथा नवखे राजकीय पक्ष आपली कुवत व राज्यातील त्यांची स्थिती समजून न घेता अमूक जागा लढवणार! तमूक जागा लढवणार! असे दररोज वेगवेगळे आकडे जाहीर करत आहेत. आणि त्यामुळे अनेक पक्षांच्या कोंडावळ्यात सापडलेला गोमन्तकिय मतदार मात्र संभ्रमात पडला आहे. काही राजकीय नेत्यांच्या वाचाळ घोषणामुळे येत्या निवडणुकीत नक्की कुणाला मत द्यावे? असा प्रश्‍न पक्षविरहीत मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनात कालवाकालव करत आहे. त्याला कारण म्हणजे यापुर्वी गोव्यात येवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांची गर्दी नव्हती. यावेळी किमान आठ ते दहा राजकीय पक्षांचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत.

कॉंग्रेस गोव्यातील जुना राष्ट्रिय पक्ष आहे त्यामुळे गोवाभर या पक्षाचा विस्तार झालेला आहे. त्यामुळेच या पक्षाचे नेते ४० जागा लढवण्याची भाषा करत आहेत. तर मगो पक्ष गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदा सत्तेवर आलेला पक्ष आहे. मात्र अवघ्याच मतदारसंघात या पक्षाचा प्रभाव आहे. या पक्षाच्या नेत्यांनी १८ जागा लढवण्याचा दावा केला आहे.

भारतीय जनता पक्ष राष्ट्रिय पक्ष असून सध्याच्या काळात त्याचा विस्तारही मोठा झालेला आहे. तरीही सालसेतमधील चार मतदारसंघात या पक्षाला स्थान नाही. सध्याच्या ४० आमदारांच्या विधानसभेत त्यांचे २७ आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड या पक्षाने मागील निवडणुकीत पाच जागा लढवून तीन आमदार निवडून आणण्याची किमया साधलेली आहे. सध्या त्यांचे १२ मतदारसंघात काम आहे. त्यामुळे वरील चार पक्षांचा विस्तार राज्यात झाल्याचे म्हणता येईल. पण इतर पक्षाचे काय? ज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. या पक्षाचा आमदार थिवीतून निवडून आला होता. मात्र सध्या तेथे या पक्षाचे अस्तित्व दिसून येत नाही. चर्चील आलेमाव यांच्यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व गोवा विधानसभेत आहे. मात्र चार मतदारसंघाच्या पलिकडे या पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी कधी नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत.

भाजपच्या पुर्वी गोव्यात आलेल्या शिवसेनेची तर तऱ्हाच वेगळी. या पक्षाचा उमेदवार फक्त एका निवडणुकीत युतीमुळे साळगावमधून जिंकण्याच्या बेतात होता. मात्र विजय निसटला. त्यानंतरच्या काळात कट्टर शिवसैनिकांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. आणि सध्या या पक्षाचे अस्तित्व दिसत असले तरी जिंकून येण्यासारखे नेते दिसत नाहीत. शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत तर २५ जागा लढवण्याची भाषा करतात. त्यामुळे मनोरंजनाशिवाय काही होत नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाने मते मागणाऱ्या आम आदमी पक्षाचा विस्तार राज्यात गेल्या काही वर्षात झालेला आहे. मात्र तो बहुमत देण्याइतका खचीतन नाही. नावेली, बाणावलीसह इतर काही जागा या पक्षाला मिळण्याची शक्यता दिसते. त्यानीही ४० ही मतदारसंघात लढण्याची घोषणा केली आहे. तृणमुलमध्ये दाखल होऊन जणू गोवा जिंकल्याचा भास झालेले माजी कॉंग्रेस आमदार लुईझीन फालेरो हे तर सध्या हवेतच उडत आहेत. ४० जागा लढवणार म्हणून सांगत आहेत. वरील पक्षाव्यतीरीक्त गोव सुरक्षा मंच, रिव्हूलेशनरी गोवन, गोयचो आवाज या पक्षांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केलेली आहे. पण जागा किती लढवणार ते जाहिर केलेल नाही.

सध्या जे दाव सुरु आहेत ते पुढील काळात बदलणार असून अनेक नेते पक्षांतर करतील, काही पक्षात युती होईल, आणि राजकीय वातावरणही बदलेल. मात्र अंथरुन पाहून पाय पसरावे! या म्‍हणीनुसार पक्षाच्या नेत्यांनी वागावे, अर्थात आपल्या पक्षाचे बळ पाहून घोषणा कराव्यात येवढीच माफक अपेक्षा मतदारांची आहे.

सर्व मतदारसंघात काम

भाजपचे काम राज्यातील सर्व मतदारसंघात आहे. त्यामुळे सध्यातरी सर्व मतदारसंघ लढण्याची तयारी सुरु आहे. येत्या काळात काही वेगळ्या घडामोडी घडल्या तर वेगळी व्यवरचना केली जाईल. काही मतदारसंघात स्थिती पाहून निर्णय घेतले जातील.

- ॲड. नरेंद्र सावईकर ( सरचिटणीस, भाजप गोवा)

अनेक नेते व कार्यकर्ते पक्षात येत आहेत

आम आदमी पक्षाचे काम सर्व ४० ही मतदारसंघात सुरु आहे. युतीबाबत विचार नाही. अनेक नेते व कार्यकर्ते आपमध्ये येत आहेत. पक्ष सर्व जागा लढवण्याबाबत ठाम आहे .

- राहूल म्हांबरे (संयोजक, आप गोवा)

गोवा फॉरवर्डची भुमीका स्पष्ट आहे

गोवा फॉरवर्ड पक्षाने राज्यात १२ मतदारसंघात नेटाने काम सुरु केले आहे. येत्या निवडणुकीत युती होवो न होवो या १२ मतदारसंघात पक्षाचे उमेदवार नक्कीच जिंकतील याचा आम्हांला पूर्ण विश्‍वास आहे.

- दुर्गादास कामत (संघटन मंत्री, गोवा फॉरवर्ड)

राज्यभर चांगला प्रतिसाद

कॉंग्रेसला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना कॉंग्रेसचे सरकार हवे आहे. अनेक युवा नेते कॉंग्रेस पक्षात येत आहेत. ४० ही मतदारसंघात पक्ष मजबूत स्थितीत आहे. पी चिदंबरम व दिनेश राव पक्षाला मजबुती देत आहेत. येते सराकर हे कॉंग्रेसचेच असेल.

- अमरनाथ पणजीकर (सरचिटणीस, गोवा प्रदेश कॉंग्रेस)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT