Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

Goa Education Quality Ranking: गोव्याने पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात रूपांतरित व्‍हावी.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याने पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात रूपांतरित व्‍हावी. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गोव्याने देशातील अव्वल राज्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. ‘स्कूल एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्स’च्या २०२५-२६च्या अहवालात गेल्या वर्षीच्या सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झालेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे.

दिल्ली व पंजाबला मागे टाकत गोव्याने ही प्रगती साधली आहे. मात्र, चौथा क्रमांक हे अंतिम यश मानण्याचे कारण नाही. उलट या कामगिरीमागील कारणे व उणिवा तपासून पुढील वाटचालीची दिशा ठरविण्याची ही योग्य वेळ आहे. क्रमवारी बदलत राहते; शिक्षणातून घडणारी पिढी मात्र राज्याच्या भवितव्याचा खरा निकष असते.

या निर्देशांकात चंदीगड (केंद्रशासित प्रदेश), केरळ, पुदुच्चेरी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले आहेत. त्यांच्या कामगिरीकडे शैक्षणिक व्यवस्थेतील वैशिष्ट्ये म्हणून पाहण्याची गरज आहे. चंदीगडमध्ये प्रशासकीय नियोजन, डिजिटल साधनांचा वापर व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन यावर भर दिला जातो. मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे योजनांची अंमलबजावणी तुलनेने सुलभ होते. उपलब्ध साधनसंपत्तीचा परिणामकारक वापर तेथे दिसतो. केरळचे मॉडेल मात्र गोव्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

साक्षरतेबरोबरच विद्यार्थी सहभाग, शिक्षकांची गुणवत्ता, सामाजिक सहभाग, डिजिटल शिक्षण व वाचनसंस्कृती यांना तेथे दीर्घकाळ प्राधान्य देण्यात आले. भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला केंद्रस्थानी ठेवणे हा केरळकडून घेण्यासारखा धडा आहे. पुदुच्चेरीनेही शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, सरकारी शाळांच्‍या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. गोव्याची स्थिती पाहता चित्राची एक बाजू निश्चितच आशादायी आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत राज्याने भरीव कामगिरी केली आहे. शाळांमधील सुविधा, डिजिटल साधने लक्षवेधी आहेत. प्रवेशाच्या निकषांमध्येही गोव्याची कामगिरी चांगली आहे. म्हणजेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक भौतिक पायाभरणी राज्याने मोठ्या प्रमाणात तयार केली आहे.

आता या पायाभरणीचे रूपांतर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शैक्षणिक प्रगतीत करण्याचे आव्हान आहे. याच ठिकाणी निर्देशांकातील काही बाबी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. विद्यार्थी सहभागाच्या निकषात गोव्याचा क्रमांक अकरावा आहे. विद्यार्थ्यांना शाळेत आणण्‍यासोबत शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शाळेची इमारत, स्मार्ट वर्ग किंवा संगणक प्रयोगशाळा उभारणे महत्त्वाचे असले तरी त्यातून शिक्षणाची गुणवत्ता आपोआप वाढत नाही. विद्यार्थी वर्गात किती सक्रिय आहेत? प्रश्‍‍न विचारतात का? प्रयोग करतात का? यावर शिक्षणाची खरी गुणवत्ता अवलंबून असते.

‘लर्निंग आउटकम्स’ अर्थात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात काय शिकले, हा त्याहून महत्त्वाचा मुद्दा आहे. गोवा गुणवत्तेच्या निकषात चांगली कामगिरी करत असला तरी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानग्रहणात अजून सुधारणा करण्यास मोठा वाव आहे. विशेषतः गणित, विज्ञान, भाषा तसेच मूलभूत आकलनक्षमतेत विद्यार्थ्यांची पातळी सातत्याने तपासण्याची गरज अधोरेखित होत आहे. परीक्षेत चांगले गुण मिळणे व एखादी संकल्पना खऱ्या अर्थाने समजणे यात मूलभूत फरक आहे. शिक्षणव्यवस्थेला या फरकाकडे गांभीर्याने पाहावे लागेल. यासाठी शिक्षक प्रशिक्षण अधिक परिणामकारक करणे आवश्यक आहे.

विद्यार्थिकेंद्रित अध्यापन तसेच मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक उपाययोजनांना प्राधान्य मिळावे. अभ्यासक्रमही अधिक रंजक, प्रयोगशील हवा. तो विद्यार्थ्यांच्या स्थानिक जीवनाशी जोडलेला असायला हवा. गोव्याने पायाभूत सुविधांच्या आघाडीवर केलेली गुंतवणूक वाया जाता कामा नये. तिचे रूपांतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात झाले तरच त्या गुंतवणुकीचे खरे फलित ठरेल. क्रमवारीत वर जाणे हा शिक्षणाचा अंतिम हेतू नाही; प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता उंचावणे हे खरे यश आहे. गोव्याने शिक्षणाची भौतिक पायाभरणी मजबूत केली आहे. सुविधांतून गुणवत्तेकडे जाण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Opportunities: 'नोकरी देता का नोकरी?' गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाईची व्यथा; ॲप्रेंटिसशीपच्या आश्वासनांपासून बेरोजगारीच्या नैराश्यापर्यंतचा प्रवास

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

Goa Police: पोलिसांचा धाक हवा, भीती नको! मायणा-कुडतरीपासून-फोंड्यापर्यंतच्या घटनांनी 'खाकी'च्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल

BCCIचा मोठा निर्णय! सेहवाग, द्रविडच्या सुपुत्रांची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री; संघाची धुरा कोणाच्या हाती?

Tilari Canal: तिळारी कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती! गोवा देणार 75 टक्के निधी तर महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा; 1 सप्टेंबरपासून पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT