

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीतील विरोधकांच्या आघाडीबाबत पुढील दोन दिवसांत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) आणि आम आदमी पक्षाच्या (आप) स्थानिक नेत्यांसोबत चर्चा सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करतानाच, गोवा फॉरवर्डने चर्चेला दिलेली स्थगिती उठवताच त्यांच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरू केली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. अशा स्थितीत आघाडीची सद्यस्थिती कशी आहे? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, येत्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ आणि ‘आप’सोबत आघाडी करण्याचे काँग्रेसने निश्चित केले असून, या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांसोबत पुढील दोन दिवसांत चर्चा केली जाईल, असे चोडणकर म्हणाले.
गोवा फॉरवर्डला आघाडीत घेण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता, गोवा फॉरवर्डने सध्या आघाडीबाबतच्या चर्चांना तूर्तास स्थगिती दिलेली आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय असून, आपण त्याचा आदर करतो. ज्यादिवशी त्यांच्याकडून ही स्थगिती उठवली जाईल, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही आघाडीबाबत त्यांच्याशी चर्चा करू.
‘गोवा काँग्रेस पार्टी’वरून गिरीश न्यायालयात
प्रदेश काँग्रेसची सोशल मीडिया खाती सुरू झाल्यापासून इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच ‘एक्स’वरही ‘गोवा काँग्रेस’ असे नाव आहे. आता ‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नावाने एका पक्षाची नोंदणी झालेली आहे. हे नाव गोवा काँग्रेसशी मिळते-जुळते आहे. या पक्षाच्या नोंदणीबाबत आलेल्या हरकतींवर योग्य निर्णय घेण्यात मुख्य निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे, असा दावा करीत चोडणकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
‘कॅग’च्या अहवालावरून काँग्रेस आक्रमक
‘कॅग’च्या लेखापरीक्षण अहवालानुसार, राज्यातील ३२१ व्यावसायिक आस्थापनांना अतिरिक्त ‘एफएआर’ मंजूर करताना योग्य शुल्क आकारले गेले नाही. त्यामुळे सरकारचा किमान १०७.३६ कोटी, तर हॉटेल्ससाठी लागू दर विचारात घेतल्यास सुमारे २,१४७ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. याप्रकरणी काँग्रेस ‘एसीबी’ आणि लोकायुक्तांकडे तक्रार करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.