Dudhsagar Waterfall Goa
Dudhsagar Waterfall Goa Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall Goa: बंदी असूनही पर्यटकांचे ‘दूधसागर’वर धूमशान

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Waterfall Goa: मैनापी धबधब्यावरील दोघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांना राज्यातील धबधब्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातली आहे.

असे असतानाही भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातील जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक रेल्वेमार्गे आले होते.

रेल्वे पोलिसांनी काही पर्यटकांवर कारवाई करत त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा केली. पर्यटकांना केलेल्या या शिक्षेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

दुसरीकडे, बंदी असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत पोहचतातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवार, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर पश्चिम घाटातील डोंगरांवरून फेसाळत खाली येणारा जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. मात्र, सध्या येथे येण्यास गोवा सरकारने बंदी घातली आहे.

बंदीची कल्पना नसल्याने या धबधब्याचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी परराज्यांतून हजारो पर्यटक नाराज होऊन परतत आहेत.

विनातिकीट प्रवास

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक तिकीट न काढताच कुळे येथे रेल्वेत चढतात. मडगावाहून रेल्वे आली रे आली की, या पर्यटकांची एकच झुंबड उडते.

रेल्वेच्या मिळेल त्या दारातून ते रेल्वेत प्रवेश करतात आणि प्रवाशांच्या सीटवर बसतात. त्यामुळे इतर प्रवाशांची कुचंबणा होते. यापुढेही आमची धडक कारवाई चालूच राहील, असे एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

कोण हा ‘ओरिसा’

कुळेतून दूधसागर धबधब्यावर नेण्यासाठी ‘ओरिसा’ हे टोपणनाव असलेली एक व्यक्ती पर्यटकांकडून पैसे उकळते आणि ही चिरीमिरी मग रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोचते, अशी माहिती मिळाली आहे.

रेल्वे पोलिस या प्रकारापासून अनभिज्ञ असावेत. रेल्वेला आतबट्ट्यात आणणारा हा चिरीमिरीचा प्रकार आधी बंद केला पाहिजे, असे कुळेवासीयांचे म्हणणे आहे.

रेल्वे प्रवासासाठी ‘चिरीमिरी’

1. दूधसागरचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक कुळे रेल्वे स्थानकावर येतात.

2. धबधब्यावर जाण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याची काहीच माहिती नसलेल्या परराज्यातील पर्यटकांना याचा फटका बसत आहे.

3. दूधसागरवर जाण्यासाठी हे पर्यटक विनातिकीट रेल्वेतून प्रवास करतात. त्यासाठी ‘चिरीमिरी’ देण्यात येते, हे उघड झाले आहे.

4. दूधसागरवर जाण्यास बंदी असल्याने हे पर्यटक पाचशे रुपयांची ‘चिरीमिरी’ देऊन रेल्वेत प्रवेश मिळवतात.

5. आगंतूक पर्यटकांमुळे रेल्वेतील अधिकृत प्रवाशांना बराच त्रास होतो; पण या पर्यटकांना त्यांचे काहीच सोयरसुतक नसते.

6. अशा बेशिस्त पर्यटकांवर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया काही रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

पर्यटकांना उठाबशा करण्यास सांगितले जात असल्याची व्हायरल व्हिडिओ क्लिप मी पाहिली आहे. या दृश्यामागची नेमकी बाब मला माहीत नाही. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्याशी मी या विषयावर बोललो आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि पुन्हा याबाबत खुलासा करू. मात्र, अशा प्रकारच्या घटना अस्वीकारार्ह आहेत.
रोहन खंवटे, पर्यटनमंत्री.

ट्रॅक बंद असल्याने गोंधळ : वास्तविक 10 जूनपासून दूधसागर धबधब्यावर पर्यटन सुरू होते. पण यंदा जुलै महिना अर्धा सरला तरी अजून पर्यटन सुरू झालेले नाही.

वन खात्याने रेल्वे ट्रॅक बंद केल्यामुळे पर्यटक मागच्या काही दिवसांपासून रेल्वे मार्गे पर्यटनास येत आहेत. बऱ्याचदा मालगाडीच्या इंजिनवर बसूनही पर्यटक दूधसागरपर्यंत जातात.

धबधबा खुला कधी करणार? : अर्धा जुलै महिना संपला तरी अद्याप वन खात्याने दूधसागर धबधब्यावरील प्रवेश बंदी हटवलेली नाही.

त्यामुळे या पर्यटनावर अवलंबून असलेले कुळे येथील शंभरहून अधिक टुरिस्ट गाईड, हॉटेल व्यावसायिक बेरोजगार आहेत. त्यामुळे हा धबधबा पर्यटनासाठी कधी खुला करणार, असा प्रश्न स्थानिक लोकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT