Goa drum circle Dainik Gomantak
गोवा

Drum Circle Goa: गोव्याचा निळाशार समुद्र, लाटांची गाज; किनाऱ्यावर रंगणारी तालवाद्यांची मैफिल ‘ड्रम सर्कल’

Goa Beach Drum Circle: सूर्य मावळतीला जात असताना गोव्याच्या काही समुद्रकिनाऱ्यांवर, अनेक जण गोलाकारात बसून शिस्तबद्धरीत्या आणि समाधिस्थ होऊन ड्रम वाजवताना दिसून येतात.

Sameer Panditrao

सूर्य मावळतीला जात असताना गोव्याच्या काही समुद्रकिनाऱ्यांवर, अनेक जण गोलाकारात बसून शिस्तबद्धरीत्या आणि समाधिस्थ होऊन ड्रम वाजवताना दिसून येतात. समुद्राची गाज आणि ड्रम्सचा लयबद्ध आवाज यांच्या एकमेकांशी रंगलेल्या स्पर्धेने किनाऱ्यावर अद्भुत वातावरण तयार केलेले असते.

पावसाळ्यात मात्र हे दृश्य लयाला जाते आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस हळूहळू कमी होत जाताना गोलाकारातले हे ड्रम वादन वाळूवर पुन्हा उमलताना दिसते. ‘ड्रम सर्कल’ या नावाने परिचित असलेला हा उपक्रम गेल्या काही वर्षांत गोव्यात बराच लोकप्रिय झाला आहे. अनेक ड्रम सर्कल ग्रुप सध्या गोव्यात अस्तित्वात आहेत.

प्रत्येक ग्रुप आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी, संध्याकाळी एकत्र जमतो. ग्रुपमधील बहुतेक जण आपापली तालवाद्ये घेऊन येतात मात्र जर त्यातील एखाद्याकडे वाद्य नसले तर ग्रुपमधून त्याला ते पुरवले जाते. डीजेम्बे, काँगो, फ्रेम ड्रम्स (डफली सदृश्य वाद्य) याचबरोबर शेकर्स/रॅट्लस (खुळखुळे), घंटा, लाकडी बॉक्स इत्यादी वाद्ये या ड्रम सर्कलमध्ये वैयक्तिक कौशल्यानुसार वापरली जातात. अर्थात ड्रम सर्कलमध्ये सहभागी होण्यासाठी वाद्य वाजवण्याचे प्राविण्य अंगी असण्याची आवश्यकता अजिबात नसते.

अतिशय सोपे ठेके वाजवून इतरांच्या तालात ताल मिसळण्यातदेखील इथे अपरंपार आनंद असतो.‌ काही वेळा मुख्य सूत्रधारावर अवलंबून विशिष्ट वाद्ये बदलू शकतात, परंतु ग्रुपमध्ये सामील असलेला प्रत्येक जण ताल आणि संगीतात मग्न होईल असे सुसंवादी आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करावे असाच तिथला एकंदर कल असतो.

गोव्यातील काही ड्रम सर्कल ग्रुप व्यावसायिक सेवाही देतात. अनेक कार्पोरेट उपक्रमात ड्रम सर्कलचे उपयोजन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, टीमवर्क सशक्त बनवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमधील सर्जनशीलता विकसित करण्यासाठी केले जाते.‌ ड्रम सर्कलमध्ये मनोरंजकपणे वेळ सारताना ग्रुपमधील सदस्यांमध्ये आपसात मजबूत बंध तयार होतो हा त्याचा एक मोठा फायदा आहे.

अर्थात व्यावसायिक सेवा देणे ड्रम सर्कल ग्रुपचे अपवादात्मक काम आहे. बहुतेक ड्रम सर्कल ग्रुपचे सदस्य केवळ त्यातील आनंदासाठी एकत्र येतात.‌ कुठल्याही प्रकारचा आकार त्यासाठी आकारला जात नाही.‌ ठरलेल्या दिवशी, विशिष्ट वेळात एकत्र येणे आणि तालांचा मनसोक्त आनंद घेणे हाच त्यातील मुख्य कार्यक्रम असतो. काही वेळा अशा सर्कलमध्ये तज्ज्ञ मंडळी येऊन वेगळ्या तालांचे शिक्षणही देतात. काही ड्रम सर्कल ग्रुप ताल आणि वाद्यांसंबंधी कार्यशाळाही आयोजित करतात.

गोव्यात कळंगुट ड्रम सर्कल, हरमल ड्रम सर्कल (हे गोवा ड्रम सर्कल या नावाने ही ओळखले जाते) हे काही लोकप्रिय ड्रम सर्कल ग्रुप आहेत.‌ कळंगुट ड्रम सर्कलच्या गरिमा चौधरी यांनी गेल्या वर्षी मिरामार येथेदेखील ड्रम सर्कल उपक्रम चालू करण्याचा प्रयत्न केला होता.‌

बहुतेक ड्रम सर्कल उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरच आपले कार्यक्रम करतात मात्र दक्षिण गोव्यात असे ड्रम सर्कल अस्तित्वात असल्याची अजून तरी खूण नाही. कधी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारताना तालांमध्ये धुंद झालेले असे एखादे ड्रम सर्कल आपल्या दृष्टीस आल्यास तिथे अवश्य थांबा आणि त्या समूहाच्या लयबद्ध तालांच्या नादाचा विलक्षण आनंद अनुभवा आणि त्यांच्या त्या लयबद्ध समाधीत आपणही गुंगून जा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

SCROLL FOR NEXT