Classical Music: टागोरांच्या घरी गायलेल्या गोव्यातील ‘सूरश्री केसरबाई' यांचा संगीत समारोह बंद का? गोमंतकीय गायन कलेचा प्रवास

Gomantak classical music: गेली कित्येक वर्षे गोव्यात चालू असलेला ‘सूरश्री केसरबाई केऱकर संगीत समारोह’ पैशांच्या चणचणीमुळे काही वर्षे बंद असल्याचे समजते. काय हा दैवदुर्विलास!
Goan classical music and artists
Classical music GoaCanva
Published on
Updated on

विकास कांदोळकर

मानवी जीवनातील समूहाच्या भावभावना, श्रद्धा, परंपरा, जीवनाधार यातून लोकसंगीताचा जन्म झाला. निसर्गगीत, संस्कारगीत, उत्सवगीत, नृत्यगीत, जातिगीत, विधीगीत, आदिमगीत, बालगीत, श्रमगीत असे विविध प्रकार गोमंतकीय लोकगीतांत आढळतात.

हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाची सुरुवात सामगानात असल्याचे मानले जाते. काही तज्ज्ञांच्या मते त्याच्याही अगोदर, सिंधू संस्कृतीत शास्त्रीय गायनाचा उगम आहे. सुरुवातीला तीन स्वरांत गायले जाणारे वेदपठण पुढे विविध स्वरांत म्हटले जात असे. भरतमुनिंच्या नाट्यशास्त्रात नमूद केलेले ‘जातिगायन’ सुमारे पंधरा शतकांच्या अगोदर दिसेनासे होऊन, राग गायन विकसित होत गेले. ‘प्रबंध गायन’ हे एक प्रकारचे बंदीश गायन असे, जे वेगवेगळ्या रागांवर आधारित असे.

त्याकाळच्या इराणी, अरबी संगीताचा प्रभाव भारतीय संगीतावर पडला. पुढे त्याच्या हिंदुस्तानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा दोन शाखा तयार झाल्या. हिंदुस्तानी संगीतात त्याकाळी, आज विरळ होत चाललेले ‘ध्रुपद’ गायन असे. यानंतर आलेली शास्त्रीय गायकी म्हणजे ‘ख्याल’ गायकी. जी आजपर्यंत विविध बंदिशींद्वारा जोपासली जाते. नवनवीन मांडणीमुळे ख्याल हा गानप्रकार समृद्ध झाला आहे.

‘त, न, ता, ना, तोम, तनन, दीम्, देरेना, दिर, देरे, तदियन’, इत्यादी फारसी मूळ असलेल्या नादमय अक्षरांचा समावेश असलेला ‘तराणा’ शास्त्रीय संगीतात गायीला जातो. वरकरणी साध्या वाटणाऱ्या तराण्यांच्या अक्षरांना गहन सांगीतिक अर्थ प्राप्त होत असतो.

हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतात मूळ सात स्वरांमध्येच गायन होते पण स्थानानुसार तपशिलात बदल आढळतो. शास्त्रीय संगीताच्या मैफलीत ध्रुपद- धमार, ख्याल यांच्याबरोबर ठुमरी व दादरा असे उपशास्त्रीय प्रकार तसेच नाट्यगीते, भक्तिगीतेसुद्धा सादर केली जातात. या सर्व गानप्रकारांना साथ देण्यासाठी तत, वितत, घन, अवनद्ध व सुषिर वाद्यांचा वापर होतो. शास्त्रीय संगीताच्या विविध शैली व घराण्यांचे संगीत जाणून घेण्यास एका विशिष्ट पातळीपर्यंत या शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. स्वर, ताल, राग ओळखणे जमल्यास आपण संगीतात फक्त साक्षर होऊ शकतो, पण संगीतातील सौंदर्याचा आस्वाद घेण्यास आपणास बराच अभ्यास करावा लागतो.

जयपूर-अत्रौली घराण्याच्या सूरश्री केसरबाई केरकर, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, जयपूर घराण्याच्या गानसरस्वती किशोरी आमोणकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजली मालपेकर तसेच इतर प्रतिभावंत मीनाक्षी शिरोडकर, हिराबाई पेडणेकर, लता-मीना-आशा-उषा मंगेशकर भगिनी, त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, इत्यादी अनेक कलाकारांनी हालअपेष्टा सोसून, परराज्यात जाऊन, स्वतःच्या हिमतीवर गायन क्षेत्रात नाव कमावले.

गोवा स्वतंत्र झाल्यावर या कलाकारांची थोडीफार दखल शासनाने घेतल्याचे दिसते. पण हल्लीच्या वर्षांत गायन क्षेत्रात गोव्याचे नाव अजरामर करणाऱ्या गायक कलाकारांना योग्य असा मान दिल्याचे दृष्टीस पडत नाही. एका विशिष्ट जातीतील लोकांचे संगीतातील योगदान पुसून टाकण्याचे प्रयत्न तर कोणी करत नाही ना? गोवा शासन आणि त्यांचे अभिजन या गायन कलेतील योगदानाला काडीचीही किंमत देत नसल्याचे खालील एकाच उदाहरणावरून दिसून येईल.

Goan classical music and artists
Goa Culture: गोव्यातील पारंपरिक लोकवादनाचा ठेवा संवर्धित करण्यासाठी कोणी तारणहार सापडेल का?

शास्त्रीय गायन साधनेत अग्रस्थानी असलेली गोमंतकीय कलावती सुरश्री केसरबाई केरकर यांचे नाव संपूर्ण भारतात अतिशय आदराने घेतले जाते. रवींद्र भवनांच्या भव्य वास्तू, गोवा सरकार ज्यांच्या नावावर उभारीत आहे, त्या प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्या घरीही त्यांचे गायन झालेले आहे. केसरबाई केरकर यांचा आवाज नासाच्या ‘व्हॉएनजर’ यानातून अंतराळ भ्रमणाद्वारे ‘जात कहां हो’ ही भैरवी घेऊन फिरत आहे.

जगातील गायन क्षेत्रात असामान्यतेचा कळस गाठलेल्या या समर्पित गायिकेच्या नावाने गेली कित्येक वर्षे गोव्यात चालू असलेला ‘सुरश्री केसरबाई केऱकर संगीत समारोह’ पैशांच्या चणचणीमुळे काही वर्षे बंद असल्याचे समजते. काय हा दैवदुर्विलास! संगीत क्षेत्रात एवढी लांछनास्पद गोष्ट गोव्यात घडताना पाहून जगात आपली काय किंमत राहील? अनेक मतदासंघात ‘फालतू संमेलने’ घडविण्यास संस्थाचालकांना मुबलक पैसा दिला जातो, पण वैश्विक कीर्ती लाभलेल्या या गोमंतकीय कलाकाराच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित समारंभाला पैशांची कमतरता?

Goan classical music and artists
Goa Culture: गोव्यातील डोंगरमाथ्यांवरील गुहेतील 'सिद्धनाथ', त्याचे प्रतिक असणारा पट्टेरी वाघ; 'पाव रे सिद्धा' हाळीमागची लोकपरंपरा

म्युझिक कॉलेज, कला अकादमी, शाळेत शिकवणाऱ्या ‘सरकारी गायकांना’, सरकारी पेन्शन घेणाऱ्या गोव्यातील गायकांना किंवा सुरश्री केसरबाई केरकर यांच्या गायकीची ‘नक्कल’ करूनही आपण त्यांची ‘प्रेरणा’ घेऊन गातो असे आवर्जून म्हणणाऱ्यांनासुद्धा या बंद पडलेल्या महोत्सवाबद्दल काहीच वाटू नये?

सरकारने हा महोत्सव त्वरित सुरू करून आपली लाज राखावी. पैशांची अडचण असल्यास चाळीसही आमदारांना ‘गोव्यात’ फिरण्यासाठी एक महिन्यासाठी ‘कदंब एसी बसचे’ पास द्यावेत. (आमदार-मंत्री होण्यापूर्वी पूर्वायुष्यात बरेच सायकल सदृश -मोटरसायकलवरून फिरत होते) त्यांच्या महिन्याच्या इंधन खर्चातून खचितच हा अतिप्रतिष्ठेचा समारोह घडून येईल, तसेच सर्व आमदार तमाम ‘गोंयकरांच्या’ आदरास पात्र ठरतील यात शंकाच नाही, कारण आजकाल कोट्यवधी रुपये संगीत शिक्षणावर खर्च करूनही ‘आउटपुट’ नसलेल्या गोव्याचे नाव, आपल्या सामर्थ्यावर अजरामर करणारी अशी महान कलाकार पुन्हा होणे दुर्मीळच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com