Goa drug image in movies vs reality Dainik Gomantak
गोवा

अंमल कायद्याचा की अमली पदार्थांचा? - संपादकीय

Goa drug image in movies vs reality: ड्रग्जचा व्यापार हा केवळ बाहेरून येणारा धोका नाही. स्थानिक यंत्रणांमध्येही शिरकाव करून अधिक धोकादायक स्वरूप धारण करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

हिंदी चित्रपटांतून निसर्गरम्य गोवा कैकदा दिसतो. तथापि, याच सुंदर भूमीचा चित्रपटांत जेव्हा स्थलवाचक उल्लेख होतो, तेव्हा अनेकदा ड्रग्ज व्यवसायाचे आश्रयस्थान दाखवले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर, ‘दम मारो दम’मध्ये गोव्याची प्रतिमा थेट आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचे केंद्र म्हणून उभी केली. ‘गो गोवा गॉन’ चित्रपटाची सुरुवात तर ड्रग्ज पार्टीपासून होते, ज्याद्वारे गोव्याचे ‘नाइटलाइफ - ड्रग्ज’ असे रूप अधोरेखित केलेय.

वेब सिरीजमध्येही हीच आवृत्ती काही प्रमाणात दिसते. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क संदर्भात गोव्याचा उल्लेख येतो. इतकेच काय प्रसिद्ध ‘सीआयडी’ मालिकेतील काही भागांमध्ये गोव्यातील ड्रग्ज रॅकेट्सवर आधारित कथानक चितारलेय. सदर माध्यमे रंजनात्मक नाट्यमयता व निवडक बाजू ठळकपणे दाखवत असली तरी त्यात वास्तवाची प्रेरणा असतेच. हे झाले दृकश्राव्य माध्यमांचे.

प्रत्यक्षात उघड होणाऱ्या अनेक प्रकरणांमुळे ‘ड्रग्ज-गोवा’ ही प्रतिमा जागतिक पातळीवर ठसली आहे. मात्र, आपण वेळोवेळी ते सोईस्कररीत्या नाकारत आलो आहोत. अवैध लाभाची लालसा क्षणिक फायदा देऊ शकते; पण दीर्घकाळात तीच त्याच्या विनाशाची बीजे रोवते. हल्लीच तेलंगणा पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय नायजेरियन टोळीचे कंबरडे मोडले.

युरोपमधून कोकेन मागवून ते गोवा, मुंबई, हैदराबादपर्यंत पोहोचवले जात होते. विशेष म्हणजे, या शृंखलेत गोव्यातील टॅक्सी चालकांपासून ते तुरुंगात असलेल्या ड्रग्ज पेडलर्सपर्यंत बऱ्याच घटकांचा वापर झाल्‍याचे उघड झाले. त्यामुळे ड्रग्जचा व्यापार हा केवळ बाहेरून येणारा धोका नाही तर स्थानिक यंत्रणांमध्येही शिरकाव करून अधिक धोकादायक स्वरूप धारण करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी कुरिअर सेवा, सामान्य व्यावसायिक व तरुणांना सहजपणे या जाळ्यात ओढले गेले आहे. या प्रकरणाने गोवा सरकारला आव्हान दिले आहे. हात बरबटलेल्‍या ‘त्‍या’ व्‍यक्‍ती कोण, हे राज्‍य सरकारने शोधावे. त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी. गोव्‍याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. सरकारकडून स्पष्टीकरण गरजेचे आहे. केवळ कृतिदल समित्या नेमून बदल घडत नाहीत.

प्रामाणिक आत्मपरीक्षण करून त्याला कृतीची जोड हवी. ‘सनबर्न’सारखे ईडीएम महोत्सव असो वा नाईट क्लब; ड्रग्जच्या अतिरेकामुळे मृत्युमुखी पडलेले कमी नाहीत. अगदी भाजपशी संबंधित असलेल्या सोनाली फोगाट यांना गोव्यात ड्रग्ज पाजून मारले गेले, असा आरोप आहे. पेडण्यात झालेल्या सनबर्नमध्ये पॉंडेचरीच्या एका तरुणाचा संशयास्‍पद मृत्यू झाला.

प्रारंभी फुटकळ कारणे पुढे केली गेली; काही महिन्यांनी ड्रग्जच्या अतिसेवनावर शिक्कामोर्तब झाले. तथापि, त्‍या पार्टीत ड्रग्ज आले कोठून, याचा शोध घेण्याची कुणास तसदी वाटली नाही. ‘बिट्स पिलानी’चे उदाहरणदेखील ताजे आहेच. वास्तवात, प्रकरणे झाकली कशी जातील, यासाठी यंत्रणा अधिक कष्ट घेतात. कोलवाळ तुरुंग तर अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे.

साहेबापासून शिपायापर्यंत सारे सामील. इलाज कुणाला करायचाच नाहीये. कारण मेले तर मरू देत. मरणारे पर्यटक वा कैदी. त्यामुळे आमचे काय जातेय? समांतर काळ्या पैशांची गंगा वाहतेय. त्याच्‍या हव्‍यासापायी राज्यातील तरुण पिढी जगता जगता मरते आहे. ज्याचे सोयरसुतक कुणालाही नाही. २०२२मध्ये हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात गोव्यातील १५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला. ‘कर्लिस’ शॅकमालकाची चौकशी झाली.

तेव्हाही गोवा पोलिसांनी आरोप फेटाळले होते. अखेर त्याच ‘कर्लिस’वर अमली पदार्थाच्या वादळातून बुल्डोझर फिरवावा लागला. ड्रग्जविरोधी कारवाया वाढल्या वा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केल्याने व्यवसायाचा बिमोड होतो, हा भ्रम आहे. सामाजिक पातळीवर त्याचे काय परिणाम झाले आहेत, याची काटेकोरपणे खातरजमा करण्याची गरज आहे, जी आम्ही याच स्तंभातून यापूर्वी मांडली आहे. किनारीच नाही, ग्रामीण भागातील स्थिती चिंताजनक बनल्याचे निरीक्षण मनोविकार तज्ज्ञ नोंदवतात.

तरुण/तरुणी अमली पदार्थांच्‍या आहारी गेल्याने कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, ज्‍याची उघडपणे वाच्‍यता होत नाही. बोरी व आजूबाजूच्या परिसरात गांजा लागवड होतेय, अशीदेखील वदंता आहे. जोवर ड्रग्ज हे समाजासाठी संकट आहे, असे आपण मानणार नाही, तोवर ऱ्हासपर्व अटळ आहे. दोन दिवसांपूर्वी हणजूण येथील एका नाईट पार्टीत इंदूरमधील २१ वर्षीय युवकाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्याने ड्रग्जचे अतिसेवन केले होते, असाही कयास आहे.

परंतु शवविच्छेदन होऊनही त्याचा उलगडा झालेला नाही. गोवा सरकारने मोठा गाजावाजा करून गोमेकॉसह वेर्ण्यात ‘रेन्डॉक्स चाचणी’ची सुविधा उपलब्ध केली. देहामध्ये अमली पदार्थ आहे की नाही, याचा छडा अवघ्या काही तासांत लागतो, असा त्याचा लौकिक असूनही निष्कर्षाप्रत पोहोचण्यास उशीर का व्हावा? सत्य समोर यायला हवे. चित्रपट, वेबसिरीज यात दाखवली जाणारी गोव्याची प्रतिमा खरी करण्याचा अट्टहास खरेच थांबेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandaulim: गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाचे काम कुर्मगतीने! वाहनांची ये-जा सुरूच; सरकारचा बंदी आदेश बसवला धाब्यावर

वरूणापुरी-शांतीनगर दरम्यानचा महामार्ग बनला 'डंपिंग यार्ड; एनएचएआय, पालिकेची डोळेझाक; संबंधितांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष

माल हाताळणीत मुरगाव बंदराने देशात गाठली आघाडी, गतवर्षी सर्वाधिक 15.91 टक्के वाढ; सर्व बंदरावर वर्षभरात 915 दशलक्ष टन हाताळणी

Sexual Assault Case: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी

घोगळ येथे दारूच्या दुकानाला आग; अग्नीशमन दलाने मिळवले नियंत्रण, चार रेफ्रिजरेटर, दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक

SCROLL FOR NEXT