फोंडा : मडकई मतदारसंघात विकास झाला असला, तरी अजूनही काही समस्या आहेत. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. अरुंद रस्ते (Narrow Roads) ही येथील मोठी डोकेदुखी आहे. पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी बऱ्यापैकी काम झाले आहे. मात्र, रस्त्याला लागून असलेल्या घरांमुळे (Roadtouch Houses) रस्ता रुंदीकरण होणे बऱ्याच ठिकाणी मुश्किलीचे ठरले आहे. या मतदारसंघात औद्योगिक वसाहतही (Industrial Area) आहे, पण त्यात अधिकाधिक रोजगारक्षम उद्योग प्रकल्प येण्याची आवश्यकता आहे.
फोंडा तालुक्यातील मडकई हा दाट लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे अन्य कुठल्याही मतदारसंघात नसतील एवढी मंदिरे मडकई मतदारसंघात आहेत. हा मतदारसंघ तसा विकासाभिमुख आहे, पण अजून विकासाची कामे बाकी असून त्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. आतापर्यंतच्या या मतदारसंघातील आमदारांनी चांगले कार्य केले आहे. गेल्या चार निवडणुकांपासून या मतदारसंघात मगोचे उमेदवार सुदिन ढवळीकर निवडून येत आहेत. त्यापूर्वी बाबूसो गावकर, रवी नाईक, श्रीपाद नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
मलनिस्सारण प्रकल्प तिढा सुटावा
फोंड्याशी निगडित मडकई मतदारसंघात येणाऱ्या कदंब बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. फर्मागुढीतील शिवाजी महाराज किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या नूतनीकरण करायला हवे. मलनिस्सारण प्रकल्पाचा तिढा सोडवून त्यावर योग्य तोडगा काढायला हवा. औद्योगिक वसाहतीत रोजगारक्षम प्रकल्पांची उभारणी झाल्यास बेरोजगारी कमी होईल. आरोग्य केंद्र असले, तरी सर्व सविधांनी युक्त असे इस्पितळ या भागात हवे. दुर्भाट-रासय किंवा मडकई-आगशी पूल झाल्यास रहदारीच्यादृष्टीने सुलभ होणार आहे. मडकई गावातील बऱ्याचजणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत, ही तेथील लोकांसाठी समाधानाची बाब आहे. तरीही बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठे प्रकल्प यायला हवेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.