Goa Dairy Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy Worker's Demand

फोंडा: गोवा डेअरीच्या कामगारांना थकीत महागाई भत्ता देण्याबरोबरच इतर मागण्या त्वरित पूर्ण करा, अन्यथा संपाचे अस्त्र पुकारण्याचा इशारा कामगारांच्या संघटनांतर्फे देण्यात आला आहे. गोवा डेअरी कामगारांच्या दोन्ही संघटनांच्या आज झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका तसेच गोमंतक मजदूर संघटनेचे अध्यक्ष पुती गावकर उपस्थित होते.

गोवा डेअरीच्या कामगारांना सहाव्या वेतन आयोगाचा महागाई भत्ता अजूनही देण्यात आलेला नाही. गेल्या जुलै २०२२ पासून हा भत्ता द्यायचे बाकी आहे. अजूनपर्यंत पाच थकीत भत्ते गोवा डेअरीने द्यायचे बाकी असून प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सातवा वेतन आयोग अजून लागू केलेला नाही, ‘प्रोबेशन’वरील कामगारांना अजून कायम केलेले नाही, यासंबंधी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे कामगार संघटनेच्या वेळोवेळी बैठका झाल्या, त्यावेळी सुभाष शिरोडकर यांनी महागाई भत्ता देण्यासंबंधी आश्‍वासन दिले होते, पण अजून त्याची कार्यवाही झालेली नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही कामगार संघटनांतर्फे निवेदन देऊन कामगारांना महागाई भत्ता देण्याबरोबरच इतर मागण्याही पूर्ण करण्यासंंबंधीची मागणी करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपण त्यात लक्ष घालू आणि कामगारांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अजूनपर्यंत कामगारांना महागाई भत्ता आणि इतर मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे कामगारांत अस्वस्थता पसरली असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे कामगारांनी सांगितले.

कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका आणि पुती गावकर यांनी कामगारांशी चर्चा केली. यावेळी कामगारांनीही आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या आणि योग्य निर्णयाची अपेक्षा केली. त्यानंतर सद्यस्थितीत गोवा डेअरी प्रशासनाला नोटीस द्यायचे ठरले आणि प्रशासकीय समितीशी बोलणी केल्यानंतर जर कार्यवाही होत नसेल, तर संपावर जाण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.

कामगारांच्या हितासाठी दोन्ही संघटना एकत्रित!

गोवा डेअरीच्या कामगारांच्या आयटक आणि गोमंतक मजदूर संघ अशा दोन संघटना आहेत. या दोन्ही संघटनांमुळे कामगार विभागले गेल्याने आंदोलनाचा विषय बाजूलाच रहात होता. मात्र, आता दोन्ही संघटना एकत्रित झाल्या असून एकसंधपणे कामगारांच्या हितासाठी लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

२३० पेक्षा जास्त कामगारांना फायदा

गोवा डेअरीच्या २३० पेक्षा जास्त कामगारांना या महागाई भत्त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे एकत्रित येऊनच हा लढा लढण्याचा निर्णय झाला. त्यात काहीजण गेला बराच काळ ‘प्रोबशन’वर असून त्यांना सेवेत कायम करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थ्यांनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT