Cutbona Betul Jetty कुटबण-बेतुल येथील 222 मीटर लांबीची विस्तारित जेटी तब्बल पाच वर्षांनंतरही वापरात आलेली नाही. सध्या कुटबण येथे मच्छीमार तसेच ट्रॉलरमालकांना जागेची कमतरता जावणते. तरीसुद्धा या जेटीचा वापर का केला जात नाही, याबद्दल मच्छीमार आश्र्चर्य व्यक्त करत आहेत.
कुटबण येथील मच्छीमार जेटीचा विस्तार पाच वर्षांपूर्वी केला होता. या जेटीवर सुमारे २०० बोटी कार्यरत आहेत. ही गोव्यातील प्रमुख मच्छीमार जेटी आहे. मात्र, या जेटीवर मच्छीमारांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बोटमालक संघटनेचे माजी अध्यक्ष पॅट्रिक डिसिल्वा म्हणाले की, जर या विस्तारित जागेत साधनसुविधांत वाढ करून तिचा वापर केला नाही तर बोटमालक जेटीवरील सर्व बोटी दूऱ नेतील.
या जेटीची मालकी मच्छीमार खात्याकडे असल्याने आम्ही कायदा हातात घेणार नाही; पण खात्याशी असहकार्य करू शकतो. मच्छीमार खात्याला जेटीचा विसर का पडला, असा प्रश्न बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी केला आहे.
संचालकांच्या आदेशाला केराची टोपली
दोन वर्षांपूर्वी मच्छीमार खात्याच्या संचालकांनी या जागेत मच्छीमारांनी सामग्रीचा जो ढिगारा टाकला आहे, तो काढण्याचा आदेश दिला होता. संबंधित बोटमालकांना नोटीसही बजावली होती.
कुटबण मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विनय तारी म्हणाले की, पाच वर्षांनंतरही येथील परिस्थितीत बदल झालेला नाही. बोटी ठेवण्यासाठी या जागेचा वापर व्हावा, अशी बोट व ट्रॉलरमालकांची मागणी आहे. मात्र, येथील साधनसुविधा वापराविना का ठेवल्या आहेत, याबद्दल सर्वांमध्ये साशंकता आहे.
असून अडचण, नसून खोळंबा
पाच वर्षांपूर्वी सरकारने या जेटीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचा विस्तार केला होता. विस्तार केला असला, तरी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. याबद्दल मच्छीमार खात्याला दोष देण्यात येत आहे.
कारण खात्याच्या उदासीनतेमुळेच सुविधांचा अभाव जाणवत आहेत. या विस्तारित 222 मीटर जागेचा वापर जाळी, सुकलेले मासे, प्लास्टिक क्रेट्स व इतर सामग्री साठवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे बोटी धक्क्याला लावता येत नाहीत. लहान बोट व ट्रॉलरवाले या जागेचा वापर होत नाही म्हणून गोंधळलेल्या मन:स्थितीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.