पणजी, आपले कला वैभव महान आहे व गावा-गावात ते दडलेले आहे. गोमंतकीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे संकलन होण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी येथे व्यक्त केले.
गुरुवारी आयएमबी च्या छोटेखानी सभागृहात चिंचोळे पणजीच्या कला निकेतन सांस्कृतिक मंडळाचा दशकपूर्ती वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ॲड. खलप बोलत होते.
त्यांच्या हस्ते कला निकेतनचे संस्थापक शेखर खांडेपारकर यांचा सत्कार व त्यांनी काढलेल्या गरुडझेप स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात दत्ताराम ठाकूर (कलारत्न पुरस्कार), विठ्ठल गावस (नाट्यभूषण पुरस्कार), चित्रा क्षीरसागर व राजमोहन शेट्ये (साहित्य भूषण पुरस्कार) व रामानंद तारी (पत्रकार भूषण पुरस्कार) यांचा समावेश होता.
व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे सहकार भारतीचे किसन फडते, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर,प्रमुख वक्ते राजू भि. नाईक उपस्थित होते.दीपा मिरिंगकर यांनी यावेळी सौ. सुरेखा खांडेपारकर यांची ओटी भरली.
ॲड. खलप यांनी, शेखर खांडेपारकर यांच्या अनेक क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व आज गोवा सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय स्थित्यंतरातून ज्या प्रकारे जात आहे त्याबद्दलची चिंता व्यक्त केली.
राजू नाईक यांनी सांगितले की, मुलांमध्ये कला, संस्कृती, साहित्य विषयक संस्कार रुजण्यासाठी बाल साहित्य महत्वाचे आहे.शेखर खांडेपारकर यांच्या विविध क्षेत्रातील सेवेचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला.
विश्वास पाटील यांनी स्वागतगीत तर राजेंद्र केरकर यांनी गीत सादर केले. शर्मिला काणकोणकर, पूजा जुवेकर, दीपक नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिले. रजनी रायकर यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.