पणजी : मोले येथील पेट्रोल पंपजवळ काल (रविवार) सकाळच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरणाऱ्या नायजेरियन महिला डामिलोला जॅनेट ओदुला (27 वर्षे) हिला सापळा रचून अटक केली. पोलिसांनी झडती घेतली असता तिने सँडलमध्ये लपविलेला 151 ग्रॅम एमडीएमए अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंमलीपदार्थाची किंमत सुमारे 15.10 लाख रुपये आहे. किनारपट्टी परिसरातील पार्ट्यांना पुरवठा करण्यासाठी ती गोव्यात आली होती. न्यायालयाने तिला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
(Drugs worth 15 lakhs hidden in sandals seized)
मोले येथे दूधसागर धबधब्यावर जाणाऱ्या युवा पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने किनारी भागातील अंमलीपदार्थ दलालांनी या ठिकाणी आपला मोर्चा वळविला आहे. यामध्ये काही विदेशींचाही समावेश आहे. युवा पिढीला हे दलाल सावज बनवत आहेत.
मोले येथील पेट्रोल पंपजवळ एक नायजेरियन महिला पर्यटकांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांचा सापळा लावण्यात आला होता.
पोलिसांकडे असलेल्या वर्णनानुसार नायजेरियन महिला येऊन ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिस पथकासमवेत असलेल्या साध्या वेशातील महिला पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिने ड्रग्ज स्वतःच्या सँडलमध्ये लपविल्याचे आढळले.
डामिलोला जॅनेट ओदुला ही पर्यटन व्हिसावर भारतात आली असून ती दिल्ली येथे राहते. आजच सकाळी ती रेल्वेने दिल्लीहून गोव्यात आली होती. तिने आणलेल्या अंमलीपदार्थाची विक्री करून ती परत दिल्लीला परतणार होती. पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश सावंत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बेकायदेशीर वास्तव्य
संशयित डामिलोला जॅनेट ओदुला ही पर्यटन व्हिसावर सहा महिन्यासाठी भारतात आली असली तरी तिच्या व्हिसाची मुदत 4 ऑगस्ट 2022 पर्यंत होती. त्यानंतर तिने व्हिसा मुदत वाढविली नसल्याने तिच्याविरुद्ध भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तिच्याकडील पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.