कुंकळ्ळी: कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ जुलै रोजी बेपत्ता झालेल्या दोन १५ वर्षीय शाळकरी मैत्रिणी अखेर महाराष्ट्रातील नाशिक येथे सुखरूप सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह मोहम्मद रशीद नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मोहम्मद रशीद हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून, तो कुंकळ्ळीत राहत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिली.
दहावीत शिकणाऱ्या या दोन्ही मैत्रिणी एकमेकींच्या शेजारी राहत होत्या. ४ जुलै रोजी सकाळी सुमारे ७:३० वाजता शाळेचा गणवेश घालून त्या घरातून बाहेर पडल्या मात्र, त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याचे कुटुंबीयांना कळताच आणि मुली घरी न परतल्याने पालकांनी तातडीने कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता.
प्राथमिक तपासात मुली गुरुवारी एकमेकींच्या संपर्कात होत्या हे समोर आले. शुक्रवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर त्या मडगावला गेल्या आणि तिथून रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्याचे समजले. मुलींपैकी एकाकडे मोबाईल होता.
सायंकाळी ७:३० च्या सुमारास तिने पालकांच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला, परंतु त्यानंतर लगेचच तिने फोन बंद केला. या फोनचे शेवटचे लोकेशन कणकवली येथे ट्रेस झाले होते, त्यामुळे मुली गोवा राज्याबाहेर गेल्या असाव्यात असा पोलिसांना संशय होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कुंकळ्ळी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली. पोलीस उपनिरीक्षक किशोर वेळीप यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तातडीने तपासासाठी रवाना करण्यात आले होते.
बेपत्ता मुलींचे वर्णन असलेली विस्तृत वायरलेस अलर्ट गोवा आणि शेजारील राज्यांमध्येही पाठवण्यात आले होते. अखेर, पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे या दोन्ही मुली नाशिकमध्ये सापडल्या आणि अपहरण करणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेण्यात यश आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.