Goa Crime: गोवा हे जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध होते. राज्याचा आकार जरी लहान असला तरी ते जगभरात शांतताप्रिय म्हणून ओळखले होते. मात्र गेल्या काही वर्षात गोवा हे ड्रग्ज व गुन्हेगारीमध्ये देशातील मोठ्या राज्यांमध्ये गणले जाऊ लागले आहे.
वाढत्या बेकायदा झोपडपट्ट्यांमुळे शांतताप्रिय गोवा गुन्ह्यांच्या विळख्यात सापडला आहे. याला रहिवास नोंदणीकडे दुर्लक्षाचाही फटका बसू लागला आहे.
पर्यटन स्थळ असल्याने गोव्यात कोणताही व्यवसाय किंवा मजुरीचे काम मिळू शकते, त्यामुळेच अधिकत्तर उत्तरप्रदेश व बिहार यासारख्या राज्यांतून गरीब लोकांचा लोंढा गोव्याकडे येत आहे.
गोवा हे झटपट पैसे कमावण्याचे राज्य असल्याचा समज देशाच्या इतर राज्यांतील लोकांचा झाल्याने गोव्याच्या लोकसंख्येइतकेच परप्रांतीय व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने आले आहेत. त्यामुळे राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात या परप्रांतियामुळेच वाढ होते.
80 टक्के गुन्ह्यांमध्ये पीडित किंवा संशयित हे परप्रांतीयच असल्याचे गेल्या काही वर्षांच्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून दिसून आले. राज्य सरकारही या परप्रांतीयाचा लोंढा गोव्यात येत आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहे.
झोपडपट्ट्यांमुळे वाढते गुन्हे
गेल्या पाच वर्षांतील खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरितांची संख्या जास्त आहे. राज्यात बांधकामांना ऊत आला अन् मजुरांना गोव्यात आणण्याची प्रथा बिगर गोमंतकीय कंत्राटदारांनी सुरू केली.
त्यामुळे ही गोव्यात स्थलांतरितांची संख्या प्रचंड वाढत गेली. त्यामुळे अनेक परप्रांतीयांची कुटुंबे गोव्यातच शिक्षण घेऊन सरकारी खात्यामध्ये कामालाही आहेत.
गोव्यात स्थायिक झालेले शेजारील राज्यांमधील स्थलांतरित सासष्टी, तिसवाडी, मुरगाव, फोंडा, म्हापसा, डिचोली आदींसारख्या तालुक्यांमध्ये जसे आहेत, तसेच संवेदनशील क्षेत्र म्हणून नावारूपास असलेली चिंबल, मेरशी, मोतीडोंगर, झुआरीनगर तसेच आल्त म्हापसा, सांताक्रुझ या भागात अनेक झोपडपट्ट्या उभ्या राहून तेथे त्यानंतर पक्की बांधकामे झाली आहेत. हाताला काम नसल्याने तरुण पिढी गुन्हेगारांच्या टोळ्यामध्ये सहभागी होऊन गुन्ह्यांमध्ये आहेत.
विदेशी अडकतात गुन्ह्यांतून गुन्ह्यांत
गेल्या काही वर्षात नायजेरियन, इस्रायल, रशियन, नेपाळी, तांझानिया या देशीतील विदेशी नागरिक गोव्यात पर्यटन व्हिसावर येतात व त्यानंतर ड्रग्जच्या कारवायामध्ये सामील होतात.
ते एखाद्या कमी प्रमाणातील ड्रग्जमध्ये पकडले गेले तर त्यांना अटक झाल्याने व न्यायालयात खटला सुरू असल्याने त्यांना व्हिसा संपल्यानंतरही न्यायालयाच्या आदेशामुळे गोव्यातच राहण्याची संधी मिळते.
त्यामुळे जामिनावर बाहेर येऊन ते पुन्हा त्याच गुन्ह्यात पुन्हा वावरत आहेत. एकेकाळी वर्षकाठी २० ते २५ ड्र्ग्जची प्रकरणे नोंद होत होती, मात्र गेल्या ३-४ वर्षांपासून ही संख्या १५० ते १७५ पर्यंत पोहचली असली तरी गोवा ड्रग्जमुक्त करण्याचे सरकारचे लक्ष्य साध्य झालेले नाही.
मतांसाठी आसरा
गोवा हे विकसनशील राज्य असल्याने मोठमोठे बांधकाम प्रकल्प गोव्यात उभे राहत आहेत. या कामांसाठी गोव्यात मजूर मिळत नाहीत. मिळणारी मजुरी गोमंतकियांना कमी असल्याने या कामासाठी कोणी पुढे येत नाही त्याचा फायदा परप्रांतीय कंत्राटदारांनी उठवून आपापल्या राज्यातील मजुरांना गोव्यात आणले आहे.
या मजुरांना मिळणारे वेतन त्यांच्या राज्यात मिळत असलेल्या पैशांपेक्षा अधिक असल्याने ते गोव्यातून काम संपले तरी जाण्यास बघत नाहीत. ते गोव्यातच गेली अनेक वर्षे बेकायदेशीर झोपड्यांमध्ये वास्तव्य करून आहेत.
त्यांच्याकडे गोव्यातील वास्तव्याचा तसेच काहीजणांकडे मतदार ओळखपत्रेही आहेत. राज्यातील काही राजकारणीच या परप्रातीयांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे परप्रांतीय गोव्यात बेरोजगार झाले, की मद्याकडे तसेच गुन्हेगारीकडे वळतात.
अनेकदा या परप्रांतीयांमध्येच कामावरून किंवा इतर कारणांवरून मतभेद झाल्यास एकमेकांचे मुडदे पाडण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या या आठवडाभरात राज्यात चार खुनांचे तसेच लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या आहेत.
त्यातील बहुतेक पीडित व संशयित परप्रांतीयच आहेत त्यामुळे गोव्याला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पूर्ववैमनस्यातून सहा खून
आज रुमडामळ दवर्ली येथे सादिक बळ्ळारी याचा झालेला खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 27 ऑगस्ट रोजी पर्वरी येथे गब्बर सहानी या उत्तर प्रदेशच्या इसमाचा खून झाला होता.
त्यामागेही पूर्वीचे कौटुंबिक भांडण असल्याचे कारण उघड झाले आहे. 6 आॅगस्ट रोजी वास्को येथे अशाच पूर्ववैमनस्यातून अँथनी फर्नांडिस या युवकाने मेहबूब शेख या 27 वर्षीय युवकाचा भोसकून खून केला होता.
जुलै 5 रोजी चिंबल येथे जयेश चोडणकर याच्यावर असाच पूर्ववैमनस्यातून रुपेश वळवईकर व प्रकाश अडकोणकर यांनी हल्ला करुन त्याला ठार केले होते, तर 15 जुलै रोजी मेरशीत पाच जणांच्या गटाकडून झालेल्या हल्ल्यात विशाल गोलतकर याचा खून झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.